देवळाली प्रवरा( जनता आवाज वृत्तसेवा ):-देवळाली प्रवरा ता.राहुरी येथिल जाधव वस्ती येथे राहत असलेल्या कांताबाई मच्छींद्र बर्डे या अदिवासी महिलेच्या छप्पराच्या घरात विजेचे शाँर्टसर्कीट होवून जळीताची दुर्घटना घडली असुन या दुर्घटनेत संसार उपयोगी साहित्यासह बचत गटाचे ५० हजार रुपयांची रोख रक्कम आगित जळून सुमारे दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. हि घटना गुरवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल जाधव वस्ती येथे अदिवासी महिला छप्पर बांधुन राहत होती. गुरवारी मध्यरात्री १;३० वाजता विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस सुरु असताना छप्पराच्या घरातील विजेच्या उपकरणात बिघाड होवून शाँर्टसर्कीट झाल्याने छप्पराच्या आतील बाजूने आग लागली. यावेळी कांताबाई मच्छींद्र बर्डे हि महिला घरात एकटीच झोपलेली होती.शेजारी राहत असलेल्या महिलेने छप्पराच्या घरातून मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे पाहिले. आरडा ओरड करुन वस्ती वरील सर्वांना जागे करुन छप्पराच्या घरातून कांताबाई मच्छींद्र बर्डे या महिलेस सुखरुप बाहेर काढण्यात आले.
छप्पराच्या आतील बाजूने आग लागली असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.आगित संसार उपयोगी साहित्य,धान्य,कपडे, दागिणेसह बचत गटाचे ५० हजार रुपये जळून खाक झाले आहे.संसार उपयोगी साहित्यासह दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गुरवारी सकाळी देवळाली प्रवराचे कामगार तलाठी दिपक साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.