लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या तालुक्याचे भूमीपुत्र उत्तम महामुने यांचा असलेला सहभाग आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे. महामुने यांच्यासारखे शूर जवान सीमेवर लढले म्हणूनच दहशतवादाचे अड्डे उध्वस्त होण्यास बळ मिळाले असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२२ व्या भागाचे प्रसारण जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकरी आणि कार्यकर्त्यां समवेत सामुहीकपणे पाहीले. विशेष म्हणजे याप्रसंगी राजस्थान सीमेवर आॅपरेशन सिंदूर मध्ये सहभाग असलेले जवान उत्तम महामुने यांची उपस्थिती होती.
‘मन की बात’च्या १२२ व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा आवर्जून उल्लेख करून भारताने दहशतवादा विरोधात उभारलेल्या लढाईबाबतची माहीती देशवासियांना दिली. यामध्ये सैनिकांनी बजावलेली यशस्वी भूमिका देशाचा गौरव वाढविणारी असल्याचे सांगितले.
तोच धागा पकडून मंत्री विखे पाटील म्हणाले की, कोल्हार येथील तिसगाव वाडीचे सुपूत्र उत्तम महामुने यांचा ऑपरेशन सिंदूरमध्ये असलेला सहभाग अभिमान वाटावा असा आहे.आपल्या तालुक्यातील एक सूपूत्र या ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत होता याला खूप महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण बजावलेल्या यशस्वी भूमिकेमुळे देश सुरक्षित राहीलाच पण पाकीस्तान पुरस्कृत दहशतवाद पूर्णपणे उध्वस्त करून याविरूध्दच्या लढाईतून मोठा इशारा पाकीस्तानला आपल्या सारख्या शूर जवानांनी दिला असल्याचे ते म्हणाले.
प्रवरानगर येथील डॉ.धनंजरराव गाडगीळ सभागृहात मंत्री विखे पाटील यांनी आज जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यासह जिल्हयातून नागरीक मोठ्या संख्येने आपली निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. प्रत्येकाचे निवेदन स्विकरारून मंत्री विखे पाटील यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिका-यांना दिल्या.