अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून २१ व्या शतकात भारत देश हा महासत्ता बनेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर आली आहे. आपल्या राज्याला संत, महंत व महापुरुषांच्या विचाराची मोठी परंपरा लाभली आहे. आजच्या युवकांनी त्यांचे विचार व प्रेरणा अंगीकारून आपली वाटचाल करावी. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ आपल्या जिल्ह्यात असून त्यांच्या त्रीशताब्दी जन्मोत्सवानिमित्त समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे. अहिल्याबाई होळकर हे आपल्या जिल्ह्याचे नव्हे तर देशाचे भूषण आहे त्यांनी ३०० वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची आठवण आपण सर्वजण आजही काढत आहोत. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी दिनानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे, उपसभापती रभाजी सूळ, संचालक हरिभाऊ कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे सचिव निरंजन डहाळे, यूपीएससी उत्तीर्ण ओंकार खुंटाळे, विलास शिंदे, अण्णासाहेब बाचकर, दादाभाऊ चितळकर, बाळासाहेब महाडिक, राहुल शिंदे, बाबासाहेब खसें, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सचिन कुसळकर आदीसह युवक मोठे संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब खसें यांनी केले तर आभार प्रदर्शन रभाजी सुळ यांनी मानले
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आजच्या युवकांनी अंगीकारून कुशल प्रशासक बनण्याचा प्रयत्न करावा, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करीत समाजामध्ये चांगले काम उभे करावे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ध्येय निश्चित करून यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी, यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून काम करावे, आपण कर्म चांगले केले असेल तर फळ नक्कीच मिळत असते असे मत यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी ओंकार खुंटाळे यांनी व्यक्त केले.
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून नगर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुणवत्तांचा सत्कार सोहळा राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा तसेच दानपट्टा सांस्कृतिक कार्यक्रमाचे व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनपटावरील प्रदर्शनाचे आयोजन केले होते, पारंपरिक रॅलीने नागरिकांची मने जिंकली असल्याचे मत भाजप युवा मोर्चाचे सचिव निरंजन डहाळे यांनी व्यक्त केले.
आजचा युवक महापुरुषांच्या विचारांपासून लांब चालला असून त्यांच्या पर्यंत विचार पोहोचविण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजामध्ये राबविले आहे. आपली संस्कृती महाना असून तिचे जतन करण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण होईल असे मत शिवभक्त आरती कडूस यांनी व्यक्त केले.