श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :-मराठी भाषेतील साहित्यनिर्मितीचा प्रारंभ श्रीरामपूर तालुक्यातील सराला गावच्या म्हाइंभट यांनी केला. त्यांनी इस १२७८ मध्ये लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती केली. हे मराठी वाड्मयाच्या सध्याच्या प्रचलित इतिहासाच्या आधारे स्पष्ट होते. पंडित म्हाइंभट सरालेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ मानला जातो. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे.
लीळाचरित्र’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक, वाड्मयीन चित्ररूप दर्शन होय. तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रे, प्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंग पंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. अशा या पहिल्या लेखकाचा विसर पडला आहे.
दरम्यान, ज्या काळात मराठीतून ग्रंथरचना करणे प्रचलित नव्हते. साहित्यनिर्मितीचे कसलेही संकेत नव्हते. मराठी भाषेतून लिहिण्याला प्रतिष्ठा नव्हती. साहित्यप्रकारांचे निकष नव्हते. अशा काळात म्हाइंभट यांच्यासारख्या प्रकांड पंडिताने मराठीसारख्या देशी भाषेतून वाड्मयीन निर्मिती केली. ही निर्मिती इतकी अपूर्व, अलौकिक आणि वाड्मयीन निकषांना उतरणारी होती की, ती काळाच्या कसोटीवर उतरून आजही साडेसातशे वर्षानंतरही आबाधित आहे. महानुभव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी बेलापूरहून उत्तर गमन करीत अमरावती जिल्ह्यातील ऋद्धिपूर येथे पोहचले. त्यावेळी त्यांचे असंख्य अनुयायांनी स्वागत केले आणि त्यांच्या आठवणी संकलित करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील सराला येथील भक्त म्हाइंभट यांनी लीळामृताच्या माध्यमातून पहिले मराठी चरित्र लिहिले. महाराष्ट्रात १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो. राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावे, यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो. मात्र, मराठी भाषेतील पहिली साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाला आपण विसरलो आहोत.
म्हाइंभटांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक व्हावे —-
म्हाइंभटांचे गाव जायकवाडीच्या प्रकल्पामुळे विस्थापित झाले आहे. आज हे गाव उजाड आहे. दुर्दैवाने आज त्या भूमीत पडकी घरे आणि वेड्याबाभळी माजल्या आहेत. अशा ठिकाणी एखादा फलक लावून, एखादा स्मृतिस्तंभ उभारून, एखादे स्मारक उभारून मराठी भाषकांनी म्हाइंभटांसारख्या लेखकाला जन्म देणाऱ्या सृजनशील भूमीला अभिवादन केले पाहिजे, अशी मागणी परिसरातील साहित्यप्रेमी व ग्रामस्थांतून होत आहे. यावर लवकरच विचार होण्याची गरज आहे.
संस्कृती संपायला फारसा वेळ लागणार नाही—
या लेखकाविषयी आपल्या मनात कृतज्ञता नाही. कौतुक नाही. कसलीही आस्था नाही. कळवळा नाही. अशावेळी पंधरवडा साजरा करण्याची उपचार करण्यात कसला अर्थ आलाय ? जेथे आपल्या भाषेतील साहित्यनिर्मितीच्या उगमाविषयी माहिती नाही. जो समाज आपला भूतकाळ विसरतो त्यावेळी ती भाषा, तो समाज, संस्कृती संपायला फारसा वेळ लागणार नाही, असे पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. शिरीष लांडगे यांनी सांगितले.