करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जैन धर्माचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या दीक्षाभूमीची मिरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेली सुमारे दोन एकर जागा शासनाने गुरु आनंद फाउंडेशनकडे वर्ग करावी, यासाठी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या जागे बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश अहिल्यानगरच्या कार्यकारी अभियंत्याला दिले आहेत. राज्यातील जैन बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जैन धर्माचार्य आनंद ऋषीजी महाराज यांची जन्मभूमी पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी, दीक्षाभूमी मिरी, कर्मभूमी पाथर्डी तर गुरुभूमी म्हणून माणिकदौंडीकडे बघितले जाते. देशातील जैन धर्मीयांच्या दृष्टीने या सर्व भूमींना अतिशय धार्मिक महत्त्व असून मिरी वगळता तीनही गावांमध्ये जागा समाजातील संस्थांकडे सुरक्षित आहेत.
तालुक्यातील मिरी येथील गट क्रमांक 958 मधील सुमारे दोन एकर जमीन रहदारी बंगला या नावाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. ब्रिटिशकाळात या जमिनीवर सोळाशे चौरस फुटाचे बांधकाम व बाराशे चौरस फुटाची पत्र्याची शेड आहे. अनेक वर्षांपासून ही जागा व इमारत पडीक आहे.
याच जागेवर आनंद ऋषीजी महाराजांनी सर्व लौकिक जीवनाचा त्याग करत जैन धर्माची दीक्षा घेत जगभर जैन धर्मप्रसाराचे कार्य हाती घेतले. त्याची मुहूर्तमेढ मिरी येथून रोवली गेली. गुरु आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे गेल्या काही वर्षांपासून येथे सुरू असून जगातील जैन धर्मीयांचे आदराचे स्थान व श्रद्धास्थान म्हणून या स्थळाचा विकास अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने होत आहे.
मागील महिन्यात प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या हस्ते जैन धर्म तत्त्वज्ञान विद्यापीठाची पायाभरणी चिचोंडी येथे करण्यात आली. त्यानंतर वर्षी तप पारण उत्सव मोठ्या प्रमाणात राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रवीण ऋषीजी महाराजांनी आमदार कर्डिले यांच्याकडे मिरी येथील दीक्षाभूमीच्या जागेबाबतचा प्रश्न मांडून अनेक वर्षांपासून समाजाकडून दीक्षाभूमीची जागा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
पांढरीपुल-मिरी-तिसगाव रस्ता चौपदरी करा
धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातूनच सततच्या दुष्काळी भागाचा सुद्धा कायापालट होणार आहे. जागा हस्तांतरण सोहळा मंत्री भोसले यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याचवेळी मिरी, चिचोंडी परिसरातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावून पांढरीपुलपासून करंजीपर्यंत, चिचोंडीपासून तिसगावपर्यंत तसेच पांढरीपुल मिरी तिसगाव असा रस्ता चौपदरी व्हावा. यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील पाठपुरावा सुरू आहे.
जैन धर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण
दीक्षाभूमीच्या मिरी येथील जागेचा प्रस्ताव शासनाने सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने जिल्ह्यासह राज्यातील जैन धर्मीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दीक्षाभूमीची जागा ताब्यात मिळाल्यानंतर लवकरात लवकर या स्थानाचा विकास प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्धार स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.