जनता आवाज
संगमनेर १६ जानेवारी ( प्रतिनिधी ) :- नाशिक पदवीधर मतदारसंघ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. अर्थात याला कारणही तसेच राजकीय भूकंपासारखे महत्त्वाचे आहे. पदवीधर संघाचे विद्यमान आ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने एबी फॉर्म देत उमेदवारी दिली. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला अर्ज दाखल न करता माघार घेतली. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर भाजपकडून कुणालाही अधिकृत उमेदवारी देण्यात आली नाही हे विशेष.
सत्यजित तांबे यांना निवडणुकीमध्ये भाजपचा पाठिंबा राहील असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले. नाशिक पदवीधर मतदारसंघात राजकारणाला अचानक कलाटणी मिळाल्यामुळे मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर हा चर्चेचा विषय बनला. राजकीय धुरीणांच्यादेखील भुवया उंचावल्या. एकंदरीत या सर्व घटना अनपेक्षित मानल्या जात आहेत. या घटनाक्रमानंतर भाजपने निवडणूक न लढता ही काँग्रेसच्या हातातून हा मतदारसंघ काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली.
उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांना या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावरून विद्यमान महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या आरोप केले. त्यांनी आपले भाचे सत्यजित थांबे यांच्या उमेदवारीवर खुलासा करावा असे आवाहन देखील विखे पाटील यांनी केले.
या सगळ्या बाबी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून घडत असल्या तरीही आ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी घेतलेला निर्णय मोघमपणे निश्चितच घेतलेला नाही. आपल्या उमेदवारीवरून या सर्व घडामोडी घडणार याची त्यांना पूर्वकल्पना असणारच. मग सत्यजित तांबे यांनी हे राजकीय धाडसच केल्याचे म्हणावे लागेल.
आ. सुधीर तांबे यांनी आपल्या पुत्राकरता उमेदवारी मागे घेतली, हे उघडरीत्या समजू शकते. मात्र काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न करता अपक्ष उमेदवारी करण्यामागे सत्यजित तांबे यांनी निश्चितच काहीतरी धोरणात्मक विचार केलेला असावा. त्यांच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाकडून टीकाटिप्पणी होणे हे स्वाभाविक मानले जाते. निलंबनाची कारवाई देखील ओघाने आलीच. मात्र तरीदेखील भाजपसारख्या मोठ्या पक्षाने काँग्रेसशी गेल्या कित्येक दशकांपासून एकनिष्ठ असणाऱ्या घराण्याला पाठिंबा देण्यामागे भाजप आणि तांबे पिता पुत्र यांच्यामध्ये निश्चितच महत्त्वपूर्ण व्यूहरचना ठरलेली असावी. नाशिक पदवीधर संघामध्ये आखावयाची गणिते ही मांडूनच सत्यजित तांबे यांनी हे पाऊल उचलले असणार असे का समजू नये.
सत्यजित तांबे यांच्यासारख्या तरुण आणि उमद्या नेतृत्वाला एखाद्या पदावर काम करण्याची संधी आतापर्यंत विशेषकरून उपलब्ध झाली नाही. त्यामुळे राजकारणामध्ये काम करण्याच्या हेतूने त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे हे स्पष्टपणे दिसून येते. भाजपनेही त्यांना अप्रत्यक्षरीत्या समर्थन दिल्याचे दिसते. मग यामध्ये सत्यजित तांबे यांची रणनीती उजवी ठरली असे म्हणता येईल. त्यांचे मामा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे एकनिष्ठ आणि विश्वासू नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. मग यादृष्टीने देखील सत्यजित तांबे यांनी उमेदवारी दाखल करतांना अगोदरच विचार केलेला असणारच.
एवढा मोठा निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करूनच आ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी ही पावले उचलली असणार. अर्थात ती राजकीय पटलावर योग्य की अयोग्य ठरतात हे येणाऱ्या काळपरत्वे स्पष्ट होईलच. परंतु दुसऱ्या बाजूला सत्यजित तांबे सारखा एक युवा चेहरा व नेतृत्व नाशिक पदवीधर मतदारसंघाला प्राप्त झाला ही देखील जमेची बाजू दुसऱ्या बाजूने चर्चेत ऐकायला मिळत आहे. निवडून आल्यास यानिमित्ताने सत्यजित तांबे यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध होईल. काम करण्याची संधी मिळेल. त्यांचे नेतृत्व गुण आणि क्षमता यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर येईल. यादेखील सकारात्मक बाबी यानिमित्ताने दृष्टीसमोर येत आहेत.
राजकारणात हल्ली युवकांचा वाढता सहभाग दृष्टीपथास येतो. मग नाशिक पदवीधर मतदारसंघ तरी त्याला अपवाद कसा राहावा. सत्यजित तांबे यांच्या रूपाने युवकाला मिळालेली ही संधी समजली जात आहे. त्यांनी उचललेले पाऊल हे राजकीय दृष्ट्या खळबळजनक जरी असले तरी या निवडणुकीत भविष्यात होणाऱ्या राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू सत्यजित तांबे हेच राहतील हे त्रिवार सत्य…