कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार बुद्रुक येथील बालगोकुलम अकॅडेमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालआनंद मेळावा हर्षोल्हासात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी छोट्या छोट्याा विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या पालकांनीही मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला.
आनंद मेळाव्याचे उदघाटन कोल्हार येथील डॉ. शशिकांत काळे व सौ. मृणालिनी काळे या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. सौ. मृणाल काळे यांनी प्रारंभी धन्वंतरीदेवतेची आरोग्यासाठीची प्रार्थना म्हटली. त्यानंतर डॉ. शशिकांत काळे यांनी उपस्थिस्त पालकांना चौरस आहार घेवून आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आजार कसे टाळावे याबद्दल समुपदेशन केले.
मेळाव्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी, पालक यांनी आपल्या स्वहस्ते बनवलेल्या ढोकळा, इडली सांबर, शेवपुरी, पाणीपुरी, कच्छी दाबेली, खोबरावडी, फळे व ज्यूस, घरगुती भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून पालकांनी आपल्या पाल्यास व्यावहारिक कौशल्य, पैशांची देवाण – घेवाण, योग्य संवाद कसा करावा व कोणते खाद्यपदार्थ आरोग्यासाठी चांगले आहे याबद्दल जाणीव व माहिती करुन दिली.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय संस्थेचे संचालक प्रा. सोन्याबापू मोरे यांनी करून दिला. आंनद मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. शारदा मोरे, सहशिक्षिका सौ. नयना रोडे, सौ. माधुरी निबे, सौ. चैताली गटणे, सौ. पूजा मोरे, सौ. सीमा लोखंडे, मिसबा शेख, रेवती ससाणे या शिक्षिकांनी परिश्रम घेतले.