पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शिक्षण सुविधा मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ८ शाळा खोल्यांना ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगतानाच लोकशाही व्यवस्थेत आजवर मिळालेल्या पदांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भक्कम व पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सातत्याने प्राधान्य दिले असल्याचे आ काशिनाथ दाते यांनी सांगितले.
आ . दाते पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच्या या सकारात्मक निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील पारनेरची कुंभारवाडी , करंदी, देवीभोयरे , कुरुंद ची हमालवाडी , पळसपूर ची ढगेवाडी, जवळे गावठाण , रेनवडी आणि भोंद्रे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रत्येकी एका खोलीसाठी १२ लाख रुपये निधी उपलब्ध होणार आहे. मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी तालुक्यातील ज्या २० नवीन शाळाखोल्यांच्या इमारत बांधकामासाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असुन त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डोंगरी विकास योजनेंतर्गत तालुक्यातील डोंगरी भागातील १४ शाळानाही शाळा डिजिटल करण्यासाठी ३७ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत असताना त्यांना भक्कम आणि सुरक्षित पायाभूत सुविधा लाभाव्यात, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाचे दार खुले करण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचेही याकामी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा विकास व व्यवस्थापन समित्या, ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून या निर्णयाचे निश्चितच स्वागत होणार असून ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेची पारनेरची कुंभारवाडी प्राथमिक शाळेसाठी १ खोली, करंदी १ खोली , देवीभोयरे १ खोली , ढगेवाडी, पळसपुर १ खोली , रेनवडी १ खोली , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा, गावठाण १ खोली, कुरुंद हमालवाडी १ खोली , भोंद्रे १ खोली मंजूर करण्यात आली आहे .



