( संजय दादासाहेब कोळसे, कोल्हार भगवतीपूर )
साडेतीन शक्तिपीठांचे एकत्रित वस्तीस्थान म्हणून कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीमाता देवालयाची संपूर्ण देशभरात आगळी – वेगळी ओळख आहे. पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे देवालय देशभरातील लाखो श्रद्धाळू उपासकांचे आराध्य तीर्थक्षेत्र आहे. कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत भगवतीमातेचा महिनाभर चालणारा यात्रोत्सव ही येथील वेगळी ओळख.
यात्रोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे पौष शुद्ध पौर्णिमेस प्रारंभ होऊन माघ शुद्ध पोर्णिमेस समाप्त होतो. शुक्रवार दि. ६ जानेवारीपासून येथील यात्रेस हर्षोल्हासात प्रारंभ होत आहे.
शिर्डी – शनिशिंगणापूर या दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीर्थक्षेत्रांच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रवरामाईच्या तीरावरील कोल्हार भगवतीपूर गावाचे भगवतीदेवी हे जागृत तीर्थक्षेत्र आहे. येथील अतिभव्य व मनमोहक मंदिरामध्ये तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, कोल्हार भगवतीपूरची भगवतीमाता, वणीची सप्तशृंगीमाता असे साडेतीन शक्तिपीठांचे एकत्रित वास्तव्य आहे. आदिशक्तीचे एकत्रित वास्तव्य येथेच पहावयास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्तींमागे चांदीची आकर्षक व रेखीव मखर बनविण्यात आली आहे. त्यामुळे गाभारा आणखीनच सुशोभित झाला आहे. दर्शनलाभाकरिता राज्यातीलच नव्हे तर परप्रांतातूनही असंख्य भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. नवसाला पावणारी जगन्माता म्हणून भगवतीमातेची सर्वत्र ख्याती आहे. आता तर मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या निवास व्यवस्थेकरिता देवालय ट्रस्टने भक्तनिवास अद्ययावत केले आहे. सुसज्ज रूम्स, सीसीटीव्ही कॅमेरे, आकर्षक फर्निचर, २४ तास गरम पाणी, डबलबेड, फिल्टरयुक्त पाणी या सुविधा माफक दरात उपलब्ध केल्या आहेत.
भगवतीमातेची यात्रा प्रतिवर्षी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा अशी महिनाभर रूढी परंपरेनुसार साजरी केली जाते. याकाळात अनेक यथोचित धार्मिक विधींबरोबरच देवालय ट्रस्ट व भगवतीमाता यात्रोत्सव समितीच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये पारंपारिक कार्यक्रमांचाही समावेश असतो. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी मंदिरात महाभिषेक, सिंदूरलेपन आणि अलंकारणसह धार्मिक विधी व महाआरतीने प्रारंभ होईल. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मंदिरासमोरून भाविकांच्या सहभागाने पारंपारिक सनई वाद्यांसह देवीच्या छबिना पालखीची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघेल. दुसऱ्या दिवशी ( दि. ७ जानेवारी ) सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्या आणि दुपारी पहिलवानांच्या कुस्त्यांचा फड भरणार आहे. ठिकठिकाणचे नामांकित मल्ल येथे हजेरी लावून कुस्तीशौकिनांची मने जिंकतात. तिसऱ्या दिवशी ( दि. ८ ) शर्यती याप्रमाणे कार्यक्रम आहेत.
यात्रेनिमित्त मंदिरात, मंदिराच्या सभोवताली तसेच परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वार कमानींसह परिसर सुशोभित करण्यात आला आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सव काळात भाविकांची दर्शनाकरता गर्दी असते. विशेषतः मंगळवारी व रविवारी दर्शनाकरिता गर्दी अधिक असते. यात्राकाळात मंदिर परिसरात पूजा साहित्य, मेवामिठाई, कटलरी आदि दुकाने असतात.
मंदिर स्थापनेचा कालखंड :
मंदिर स्थापनेचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख असून जुने मंदिर हे अनादीकालीन असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या दक्षिण भारतातील तुघालाकांची सत्ता नष्ट होऊन विजयनगर व बहामनी ही दोन प्रबळ साम्राज्ये उदयास आली. त्या साम्राज्यकालीन दोन व्याघ्रशिल्प मंदिरात आहेत. ही व्याघ्रशिल्पे व उपरोल्लेखित काळातील गडावरील शिल्पात कमालीचे साम्य आढळून येते. हेमाडपंथी बांधकाम १३ व्या शतकात झाले आहे. विजयनगर साम्राज्याचा कालखंडही १२२६ मधील आहे. त्यामुळे श्री भगवतीमाता मंदिराचे बांधकाम त्याकाळी सुमारे ६०० वर्षांपूर्वी म्हणजे १३ व्या शतकात झाले असावे असे मंदिर स्थापनेविषयी अनुमान सांगितले जाते.
मंदिर परिसर सुशोभीकरण :
एक कोटीहून अधिक खर्च करून कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टच्या माध्यमातून देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरातील पुरातन मूर्तींच्या जागी नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळ्याने झाली. याशिवाय ट्रस्टअंतर्गत विठ्ठल – रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिर याचबरोबर येथील कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचे जिर्णोद्धारकार्य पूर्ण झाले आहे. देवीच्या मंदिरातील भव्य सभामंडप, ग्रॅनाईट फरशीचे काम, दीपमाळेपुढील आकर्षक व भव्य व्यासपीठ, मंदिराच्या सभामंडपाच्या कमानी, मंदिरातील आकर्षक व रेखीव नक्षीकाम, भक्तनिवास, रंगरंगोटी या सर्व गोष्टींमुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश आहे. त्याअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या काही निधीतून ट्रस्टद्वारा गावात महत्त्वाच्या ठिकाणी बसविलेल्या हायमॅक्स पथदिव्यांच्या झगमगाटाने गाव उजळून निघाले. याशिवाय मंदिराच्या प्रांगणात वाहनतळ उभारण्यात आलेले आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे तसेच वृक्षारोपणामुळे परिसर सुशोभित झाला आहे. प्रसन्न व आकर्षक परिसर निर्मिती झाल्यामुळे भाविकांमध्ये समाधान आहे.