पाथर्डी(जनता आवाज वृत्तसेवा) :- पाथर्डी शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात सलग तीन ठिकाणी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैद्य द विदेशी दारू, धारदार कोयते, तसेच मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आले असून यापूर्वीच्या कारवाईतून फरार असलेला एक आरोपीही अखेर अटकेत आला आहे. या धडक कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांतून पोलीस दलाच्या कार्यशैलीचे जोरदार स्वागत होत आहे.
दि. ३० जून रोजी सकाळी पाथर्डी पोलिसांना एडके कॉलनी येथे काही इसम विदेशी दारू बेकायदेशीररीत्या साठवून ठेवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी संतोष खाडे यांनी गुप्ततेत नियोजन करत तातडीने कारवाई केली.विशेष पोलिस पथकासह छापा टाकण्यात आला. या पथकात पोलीस कर्मचारी राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनिल दिघे, जालिंदर दहिफळे, विजय ढाकणे, दीपक जाधव आणि चालक बाळासाहेब जाधव यांचा समावेश होता.
छाप्यात काल्या उर्फ तौफीक निजाम शेख (वय २७, रा. जुनी पंचायत समिती रोड) व अल्ताफ रशीद शेख (वय २२, रा. इंदिरानगर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २,७०० बाटल्या विदेशी दारू जप्त करण्यात आल्या, ज्यांची चार लाख ६५ हजार १२० रुपयांची दारू जप्त केले आहे.
या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.
त्यानंतर खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक पुतळ्यामागील ‘रॉयल स्टार पान टपरी’वर दुसरी धडक कारवाई करण्यात आली. टपरीतील झडतीदरम्यान प्लायवुडच्या ड्रॉवरमध्ये दोन धारदार लोखंडी कोयते आढळले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता टपरीच्या मागील बाजूस सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मावा तयार करणारे यंत्र लपवलेले सापडले.
या कारवाईत रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २६, रा. हंडाळवाडी, ता. पाथर्डी) आणि ईशान हरुन शेख (वय २६, रा. कसबा पेठ, पाथर्डी) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4(25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीच्या एका मावा अड्यावर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या आरोपीसही अखेर या मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आले. खाडे यांनी घेतलेली ही तिसरी धडक कार्यवाही ठरली.
अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत, नागरिकांत समाधान
पाथर्डी शहरात अवैध दारू, मावा विक्री व शस्त्रसाठा यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संतोष खाडे आणि त्यांच्या पथकाने घेतलेली ही तिहेरी कारवाई अत्यंत गुप्तता आणि अचूक नियोजनात पार पडली.
शहरात गुन्हेगारीस आळा बसावा, अवैध धंद्यांना रोखावे यासाठी अशा कारवायांची नितांत गरज असल्याचे नागरिक म्हणत असून पोलिसांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले जात आहे.