जामखेड(जनता आवाज वृत्तसेवा) :- माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा असून या कृत्याचा निषेध आ. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करून केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील नान्नज याठिकाणी रविवार, दि. 29 जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात आसताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे (वय 25, रा. बोर्ले, ता. जामखेड) व त्याच्या सोबत त्याचा एक अल्पवयीन आरोपी मित्र असे दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फीर्यादी मुलगी हिच्या वर्गातीलच आहे.
यानंतर सामान देण्यासाठी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊनमध्ये आले. यावेळी अल्पवयीन मुलाने त्या मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले. तर आरोपी मनोज हुंबे याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन आरोपी पळुन गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे व त्याचा एक अल्पवयीन मित्र (दोघेही रा. बोर्ले, ता. जामखेड) या दोघांनवर जामखेड पोलीस ठाण्यात पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आ. पवारांनी केला संताप व्यक्त
आ. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करित म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा असून या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. यासंदर्भात पोलिस अधीक्षक घार्गे यांच्याशी बोलणं झालं असून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या आरोपीलाही तातडीने अटक करण्याबाबत पोलिस प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पण अटक झाली नाही, तर ते प्रशासनाला परवडणार नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.