संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. नाशिक- पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात हा अपघात झाला असून या अपघातग्रस्त बसमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थी होते. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन तीन बस जात असतात. रोजप्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या. यात आज सकाळी एक बस ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी गावाकडे निघाली होती. या बसला अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या गटारमध्ये बस पलटी झाली आहे.
दरम्यान सध्या पुणे- नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. अशातच या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. यातच स्कूल बसला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही स्कूल बस चालकाचा ताबा सुटला. यानंतर बस चंदनापुरी घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईट गटारात पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेल्या विद्यार्थी जखमी झाले आहेत.
स्कुल बसचा अपघात झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पालकांना घटनेची माहिती समजतात त्यांनी रुग्णालयात धाव घेत आपल्या पाल्यांना धीर दिला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.