लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-टाळ मृदुंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष आणि भगवी पताका खांद्यावर घेवून सहकार आणि ज्ञानाच्या पंढरीत आज ख-याअर्थाने ‘अवघा रंग एकची झाला’ हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दिंडी आणि रिंगण सोहळ्याच हृदयस्पर्शी सोहळ्याने अध्यात्म आणि संस्कृतीचे शिस्तबध्द असे दर्शन घडविले.
निमित्त होते आषाडी एकादशीचे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ‘वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची’ ही संकल्पना घेवून दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने गावागावातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा सहभाग असलेल्या दिंड्या आज सकाळीच सहकाराच्या भूमीत दाखल झाल्या.
लोणी गावातील प्रमुख मार्गावरुन सुरु झालेल्या या दिड्यांचा प्रवास उन, पावसाची सर झेलत रिंगण सोहळ्याच्या मैदानाकडे विठू नामाचा जयघोष करीत रवाना झाल्या. विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक, शिक्षक यांनी परिधान केलेली वेशभूषा, हातामध्ये भगवे झेंडे आणि डाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत या दिंडी सोहळ्यात सर्वजन रंगून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रिंगण सोहळ्याच्या मैदानाकडे यासर्व दिंड्या रवाना होत असताना राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या विश्वस्त सौ.सुवर्णा विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायातील सर्व प्रतिनिधी या दिंडीमध्ये सहभागी झाले.
विठू नामाचा जयघोष करीत वारक-यांचा हा मेळा सैनिकी स्कुल समोरील प्रांगणात दाखल झाला. सर्वांच्या सहभागाने या मैदानावर रिंगण सोहळ्याच्या मैदानावर प्रति पंढरपूर अवतरले होते. भगव्या झेंड्याची पताका नाचवत घोड्यांचा सहभाग असलेला रिंगण सोहळा संपन्न होत असताना सर्वांना पंढरपुरच्या वारीमध्ये साकारले जाणारे रिंगणच अनुभवण्याची संधी आज मिळाली. सहभागी असलेल्या विद्यार्थी वारक-यांचे टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करुन, अभिनंदन केले. मंत्री विखे पाटील आणि सौ.शालिनीताई विखे पाटील यांची व्यासपीठावरील फुगडी तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि डॉ.सुजय विखे पाटील यांची फुगडी सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली.
या अध्यात्मिक आणि सांस्कृतीक सोहळ्याच्या आयोजनाचे कौतूक करुन, मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा सोहळा म्हणजे साक्षात पंढरपुरमध्ये अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग असे वातावरण निर्माण करणारा आहे. या वारीमुळे सांस्कृतीक आणि सामाजिक एकतेचा संदेश सर्वांना मिळाला असून, वारी म्हणजे अध्यात्म आणि सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारा एक सांस्कृतीक उत्सव आहे. हा वारसा पुढच्या पिढीला समजावा म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आयोजित केलेला हा हृदयस्पर्षी सोहळा संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेणारा आहे.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे वारकरी संप्रदायावर असलेले योगदान हे सर्वश्रृत होते. त्याच विचारांनी प्रवरा परिवाराची अध्यात्मिक क्षेत्रात सुरु असलेली वाटचाल ही येणा-या पिढीलाही संस्कारीत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांनी हा सोहळा पाहताना आम्हाला साक्षात पंढरपुरची आठवण येत आहे. जे वातावरण पांडुरंगाच्या भूमीत निर्माण होते तसेच वातावरण आता या शिक्षणाच्या माहेर घरात निर्माण झाले असून, डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला हा अनोखा सोहळा अध्यात्मिक क्षेत्रामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना या अध्यात्मिक सोहळ्यात विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक यांचा उत्साह हा कौतुक करण्यासारखा आहे. एखाद्या शिक्षण संस्थेने पुढाकार घेवून साक्षात वारीचे दर्शन घडविणारा सोहळा आयोजित करुन, पंढरपुरच्या अध्यात्मिक सोहळ्याचा आनंद सर्वांना मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवरेची या सोहळ्यातून नव्या पिढीला आषाडी वारीसाठी पंढरपुरला जाणा-या वारीचे महत्व समजावे हा उद्देश होता. मागील पंधरा दिवसांपासून या अध्यात्मिक आणि सांस्कृतीक सोहळ्याची जयत्त तयारी करताना विद्यार्थ्यांना वारीमध्ये गायले जाणारे अभंग, टाळ आणि मृदुंगाच्या तालावर खेळले जाणारे खेळ, रिंगण सोहळा, पाऊली यासर्वांची शिकवणूक या निमित्ताने विद्यार्थ्यांना देता आल्याचे समाधान डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केले.