शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त श्री.एस.प्रकाश यांच्या देणगीतुन श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
आषाढ शु ।।११ शके १९४७ आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाई मंदिरात साजरा केला जात असे. परंपरेनुसार, हा उत्सव आजही साजरा केला जातो. दुपारच्या आरतीच्या वेळी, विठ्ठल भगवानांचा फोटो समाधी चौथऱ्यावर ठेवण्यात आला तर धूप आरतीच्या वेळी, श्री विठ्ठलची मराठी आरती गायली जाईल.
या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री 8 ते 9 या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न होईल. रात्री 9:15 वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीत काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल.
आषाढी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात आयोजित साबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे ४५ हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला. तर २१,६९० भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. यासाठी संस्थानने ६४ पोते साबुदाणा, ४२ पोते शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे २७०० किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला.