अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका, नेवासा व पाथर्डीमध्ये अवैध वाळू वाहतूक व दारु बाळगणारे १० आरोपींविरुध्द कारवाई करुन ६१ लाख ७४ हजार ६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकातील परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि.१६ जुलै २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलीग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करत असून आता गेल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सदरील ठिकाणी पोहचले असता उपासलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डंपर व ट्रक्टरमध्ये भरुन वाहतूक करताना दिसले. यावेळी पोलीस पथकाची त्यांच्यावर छापा टाकला.
यावेळी सदरील व्यक्ती हे वाहनासह पळून जाऊ लागले. त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करुन ४ डंपर व १ ट्रक्टर पकडले. यावेळी चालक अर्जुन भाऊसाहेब गुरुळे (वय ३०, रा. मुर्शदपूर, ता. कोपरगाव), संतोष लक्ष्मण ठमके (वय ३०, रा. मुर्शदपूर, ता. कोपरगाव), गणपत पंडीत पवार (वय २७, रा. पारेगाव ता. येवला जि. नाशिक), मालक अमोल वसंत मांडगे (फरार, रा. कोपरगाव), अमोल लक्ष्मण इंगळे (वय ३१, रा. मळेगाव थडी ता. कोपरगाव), मालक रामा कुंदलके (फरार, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव), चालक व मालक अजय शेळके (फरार, रा. कोपरगाव) असे आरोपी निष्पन्न झाले. या आरोपींकडून जवळपास एकूण ५५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच दि.१५ जुलै २०२५ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीरादारामार्फत माहिती मिळाली की, पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पागोरी पिंपळगाव गावामध्ये काही व्यक्ती अवैध दारु विक्री करत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी खाजगी वाहनाने संबंधित ठिकाणी रवाना झाले. यावेळी पागोरी पिंपळगाव गावात पेडा चौकात एका टपरीच्या आडोशाला छापा टाकला त्याठिकाणी साईनाथ शिवदास घनवट (वय ३७, रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी) हा मिळून आल्याने त्याच्याकडून एकूण ९ हजार ३२५ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारुचा साठा मिळून आला. यावेळी त्याच्यावर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर पागोरी पिंपळगावातील हॉटेल महेशमध्ये छापा टाकला असता नवनाथ भिमराव कुटे (वय ४५, रा. पागोरी पिंपळगाव) हा मिळून आल्याने त्यास पोलीस पथक असल्याचे सांगून विश्वासात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली काउंटरमध्ये एकूण ७ हजार ३६५ रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारुचा साठा मिळून आला. यावेळी त्याच्यावर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे कोपरगाव तालुका, नेवासा व पाथर्डीमध्ये अवैध वाळू वाहतूक व दारु बाळगणारे १० आरोपींविरुध्द कारवाई करुन जवळपास ६१ लाख ७४ हजार ६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केली आहे.