वैजापूर(जनता आवाज वृत्तसेवा):-अंधश्रद्धेच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भोंदूबाबाविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला असून, हा प्रकार वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात घडला आहे.
संशयिताचे नाव संजय रंगनाथ पगार (रा. शिऊर) असे असून, तो स्वतःला “जागृत स्थळाचा देव” असल्याचा दावा करत होता. त्याने अनेक सामान्य नागरिकांना आपल्या “स्थळी” बोलावून त्यांच्यावर कथित उपचार करण्याचे नाटक रचले. त्यासाठी तो विविध भोंदू प्रकारांनी लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता, असे पोलिसांनी सांगितले.
असा उघडकीस आला प्रकार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांना या संशयास्पद उपचारांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकाराचे चित्रिकरण केले. या व्हिडिओमध्ये संजय पगार हा पीडितांच्या चेहऱ्यावर बुट ठेवताना आणि हातात ढोलकी वाजवून “अलख निरंजन, अलख निरंजन” असे म्हणत त्यांना झटके देताना दिसून आला. याशिवाय, तो लोकांच्या दुःखांवर उपाय असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचाही आरोप आहे.
अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हा
सदर व्हिडिओ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यानुसार, कोणत्याही प्रकारची जादूटोणा, भोंदूपणा किंवा अंधश्रद्धा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे.