श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :-काल नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आज एका वेगळ्या प्रकारची अस्वस्थ शांतता पसरली होती. शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी एका व्यक्तीने आपल्याच देहाची होळी करण्याचा निर्धार केला होता. आंदोलक घोषणा देत होते, भावनांचा कल्लोळ उसळला होता, आणि याच तणावाच्या गर्दीत एका पोलीस कॉन्स्टेबलने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. आंबेडकर चळवळीतील मनोज काळे यांनी बाबासाहेबांचे पूर्णाकृती स्मारक निवेदने देऊन देखील न्याय मिळत असल्याने, आपल्या मागणीसाठी आत्मदहनाचा मार्ग निवडला. श्रीरामपूर नागरपरिषदेच्या मागच्या बाजूने जेव्हा ते स्वतःला आगीच्या हवाली करण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा एका सतर्क नजरने त्यांना हेरले. ही नजर होती पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे यांची. विशेष म्हणजे, आज त्यांची साप्ताहिक सुट्टी होती, पण कर्तव्याची हाक त्यांना स्वस्थ बसू देईना.
क्षणार्धात दुकळे यांनी झडप घातली आणि काळे यांना घट्ट पकडले. एका क्षणासाठी सारे वातावरण स्तब्ध झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह समाधान सोळंके, आजीनाथ आंधळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काळे यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
आज जर पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे यांनी ती तत्परता आणि सतर्कता दाखवली नसती, तर कदाचित एक मोठी दुर्घटना घडली असती. त्यांच्या या निस्वार्थ आणि समयसूचक कृतीमुळे मनोज काळे यांचे प्राण वाचले, आणि म्हणूनच ते आज केवळ पोलीस दलाचेच नव्हे, तर संपूर्ण श्रीरामपूर शहराचे हीरो ठरले आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. पोलीस दलातील या देवदूताला सलाम!