कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेचा 49 वा वर्धापन शनिवार दि.19 जुलै रोजी उत्साहात साजरा झाला.कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी कृषी अधिकारी मीना जाधव आणि रचना साबळे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी केले.विद्यालय वर्षागणिक प्रगती पथावर जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यालयाची स्थापना 19 जुलै 1976 या वर्षात झाली असून गेल्या 18 वर्षापासून विद्यालय 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकाल देत आहे. डॉ. भास्करराव खर्डे यांनी विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार यांच्या पाल्यांसाठी विद्यालयास सदोदित विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्धतेसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण सदैव प्रयत्नशील आहे. विद्यालयाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देखील उज्वल यश संपादन केले आहे.
याप्रसंगी विद्यालयाच्या बाबतीत त्यांनी एक आठवण आवर्जून सांगितली ती अशी की सण 1999 ते 2006 या कालावधीमध्ये विद्यालयाची ख्याती पार रसातळाला गेली होती त्यावेळी स्थानिक व्यवस्थापन कमिटीने हे विद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता परंतु येथील स्थानिक रहिवासी, पालक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या गोष्टीला विरोध केला व आणखी एक संधी देण्याची विनंती केली.
त्यावेळी आम्ही प्रिन्सिपल म्हणून मोरे यांची नव्याने नियुक्ती केली त्यानंतर आजतागायत म्हणजे 2007 पासून विद्यालय उत्तरोत्तर प्रगती करत असून ऍडमिशन फुल असे बोर्ड लावण्यापर्यंत वेळ आली आहे ती केवळ सुधीर मोरे व त्यांच्या टीममुळेच त्यांनी यावेळी मोरे सरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले व भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.सर्व शिक्षक मेहनतीने विद्यार्थ्यांचा उत्कर्ष साधत असल्याने पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यालय केवळ शैक्षणिक गुणवत्ताच निर्माण करीत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देत आहे. माजी विद्यार्थिनी रचना साबळे हिने विद्यालयाला धन्यवाद देताना स्वतःच्या प्रगतीमध्ये विद्यालयातील शिक्षकांचे स्थान पालकां इतकेच महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
दरम्यान याप्रसंगी भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजी देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पुढील वर्षीच्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देवकर परिवारातर्फे पाच हजार रुपये रोख देणगी देऊ केली. दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या सार्थक काळे, सेजल गुंजाळ, प्रणाली खर्डे,दुर्वेश लोळगे,नुपूर झगडे या पाच विद्यार्थ्यांचा तसेच रुद्र अमोल खर्डे याचा इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आल्याबद्दल पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अशोक शेठ असावा, ज्ञानेश्वर खर्डे, अलका देवकर , सुनील शिंदे, प्रशांत खर्डे, मधुकर खर्डे, भागवत शेळके, अक्षय मोरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद काळे, कदीर शेख, अमोल खर्डे, बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली अंबुलगीकर आणि श्रावस्ती वानखेडे यांनी केले तर आभार मिताली खर्डे हिने मानले.