कोपरगांव (जनता आवाज वृत्तसेवा):-कोपरगांव शहरातील इंदिरापथ रस्त्यावर विकसित करण्यात येत असलेल्या नामदेवराव परजणे पाटील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा उद्यानात राज्याचे जलसंपदामंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या उभयतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कोपरगांव शहराच्या सुशोभिकरणात भर घालणाऱ्या या उद्यानाची संकल्पना बघून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करुन ज्येष्ठ नागरीकांना आपल्या आयुष्यातले उर्वरीत क्षण आनंदाने घालविण्यासाठी या उद्यानाचा चांगला उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील इंदिरापथ रस्त्यावर नामदेवराव परजणे पाटील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा उद्यान विकसित करण्यात येत आहे. या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तसेच फुलझाडी लावण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरीकांना सकाळ – सायंकाळ वेळ घालवता यावा यासाठी बसण्यासाठी बाकांची व खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. बालकांना खेळण्याच्या साहित्याची सोय केली जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान असल्याने ज्येष्ठांना याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
उद्यानाच्या शेजारी असलेल्या वरदविनायक मंदिरात जाऊन विखे पाटील उभयतांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. राजेश परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन उद्यानाची संकल्पना विषद केली. याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. सुशिलाताई म्हस्के पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव, अनिल सोनवणे, मनोज अग्रवाल, अशोक कोठारी, उत्तमभाई शहा, प्रा. अंबादास वडांगळे, संदीप देवकर, विकास आढाव, गणेश आढाव, ॲड. मनोज कडू, केशवराव भवर, नंदकुमार विसपुते. बाबासाहेब परजणे, खंडू फेपाळे, लक्ष्मणराव साबळे, दिलीपराव ढेपले, सोमनाथ निरगुडे, विजय परजणे, बाबुराव खालकर, कैलास भुतडा, एस. के. थोरात, विजय वडांगळे, सोपान चांदर, यशवंतराव गव्हाणे, सिताराम कांडेकर, गोपीनाथ केदार, भिकाजी झिंजुर्डे, संजय टुपके, दिगंबर टुपके, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड यांच्यासह नागरीक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.