जामखेड (जनता आवाज वृत्तसेवा):-जामखेड तालुक्यातील एका गावातील दुकानात चप्पल बदलुन घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढुन तिचा दुकान मालकाने विनयभंग केला. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दुकान मालका विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच गावात दि. २९ जुन रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती महिन्याच्या आतच याच गावात दुसरी घटना घडली आहे.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की एक अल्पवयीन मुलगी चप्पलच्या दुकानात चप्पल बदलण्यासाठी गेली होती. यावेळी शुज सेंटरचा मालक याने अल्पवयीन मुलीस डोळा मारुन व हात धरुन जवळ ओढत विनयभंग केला. तसेच अल्पवयीन मुलीस सदरची घटना कोणाला सांगितली तर तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर तिने आपल्या वडीलांसोबत जामखेड पोलीस स्टेशनला येऊन फीर्याद दाखल केली. यानंतर वरील आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.
महिन्याच्या आतच याच गावात दुसरी घटना घडली असून २९ जून रोजी याच गावात दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊनमध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता परत याच गावात विनयभंगाची व पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.