पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी तालुक्यातील एका २६ वर्षीय तरुणीने थेट पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव बचावल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला रविवारी दुपारी थेट पाथर्डी पोलिस ठाण्यात आली होती. ती थेट आतील बाकड्यावर बसून काहीशा अस्वस्थपणे बोलत होती. तिच्या हावभावांवरून ती मानसिकदृष्ट्या व्यथित असल्याचे दिसून येत होते. तिच्याकडे विषाची बाटली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण केले.
ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी चंद्रावती शिंदे आणि स्मिता सानप यांनी तत्काळ धाव घेत युवतीच्या हातातील विषाची बाटली हिसकावली. यामुळे बहुतांश विष खाली सांडले व युवतीचे प्राण वाचले. परंतु थोडेफार विष तोंडात गेल्याने तिची प्रकृती खालावली. लगेचच पोलीस उपनिरीक्षक जाधव व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला पोलीस वाहनातून पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथे तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या प्रकरणामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची चौकशी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने विष घेण्यापूर्वी पोलिस ठाण्यात काहीसा गोंधळ घालितला होता. “त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो” असे ती वारंवार म्हणत होती. यावरून ती कोणत्यातरी दबावाखाली होती, असा संशय व्यक्त होत आहे.पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ कृती यामुळे एक मोठा अनर्थ टळला. विषप्राशन करीत असताना यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची शंभर टक्के दक्षता आणि तत्परता वाखाणण्याजोगी ठरली.दरम्यान, पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.