लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-बदलत्या शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देण्याची गरज आहे या दृष्टीने प्रवरा कृषी शास्त्र संस्थे अंतर्गत सूरू करण्यात आलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हायटेक शेती प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. या नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहीती आणि शेती व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र, संस्था, लोणी अंतर्गत “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्ट”चे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे,महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठता डाॅ.प्रशांत बोडखे,संस्थेचे सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्रवरा कृषी शास्त्र, संस्थाचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम आदीसह प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित होते.
प्रकल्पाची पाहणी करताना मंत्री विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी कृषी क्षेत्रातील त्यांचे अनुभव सांगत शेतीमध्ये आज सेंद्रिय खते, जैविक खते आणि पर्यावरणाचे संवर्धन राखून शेती व्यवसाय करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी विविध गोष्टींवरती त्यांनी चर्चा करताना कृषी क्षेत्रा समोरील आव्हान आणि समस्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्याना अनुभवातून समजून सांगितले.
नर्सरीमध्ये विद्यार्थ्यानी लागवड केलेल्या विविध पिकाची माहिती जाणून घेत प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत सुरू झालेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकाच वेळी कमी क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, विविध रोग किडींचे नियंत्रण त्याचबरोबर प्रक्रिया पॅकिंग आदींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम कृषी संलग्नित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राचार्य शिक्षक यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांना पारंपारिक भाजीपाला पिकाबरोबर परदेशी भाजीपाला पिकांची ही माहिती मिळणार आहे. माळरानावर देखील चांगल्या पद्धतीने जर नियोजन केले नव्या तंत्रज्ञानातून शेतीत चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकतं हे प्रत्यक्ष कृतीतून या विद्यार्थ्यांनी दाखवून दिला आहे याचेही कौतुक मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केले.