लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात या उपक्रमांतर्गत प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि 19 जुलै 2025 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर ते शनि टेकडी औरंगपूर हे जवळपास 12 किलोमीटर अंतर पायी चालत एक अनोखा नवोपक्रम साजरा केला. सदर गिर्यारोहण व शिवार फेरीचे उद्घाटन संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या गिर्यारोहणात शाळेच्या एकूण 542 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये 440 विद्यार्थी व 102 विद्यार्थिनींचा सहभाग होता. शाळेच्या विद्यार्थ्यांनी औरंगपूर येथील शनि टेकडी येथे पायी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शिवार फेरी, गिर्यारोहण व क्षेत्र भेटीचा आनंद लुटला. या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना नवीन परिसराची माहिती मिळाली. याद्वारे श्रमप्रतिष्ठा,साहस व धाडस या मूल्यांची जोपासना करण्यात आली. अशा क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण होऊन भविष्यातील निश्चित केलेल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करता येते. असे नवोपक्रम प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये नेहमीच राबवले जातात.
सदर गिर्यारोहण व शिवार फेरीत शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे, क्रीडा संचालक श्री रमेश दळे, सर्व क्रीडा शिक्षक व शिवारफेरीचे समन्वयक श्री ए डी पटेल यांनी आपला यशस्वी सहभाग नोंदवला.