अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने नवनागापूर, एमआयडीसी येथील मावा तयार करणारा कारखाना उध्दवस्त करुन सुगंधी तंबाखू, तयार मावा, कच्ची मावा सुपारी व चारचाकी वाहनासह एकूण ८,७६,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पाच आरोपी जेरबंद केले आहे.
अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे दि.२२ जुलै रोजी अहिल्यानगर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. यावेळी पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता शुभम दत्तात्रय हजारे हा आनंदनगर, नवनागापूर येथील अमोल संप्रे यांच्या विल्डींगच्या टेरेसवर पत्र्याच्या शेडमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व सुगंधीत तंबाखूपासून मावा बनविण्यासाठी सुपारी, चुना पावडर, तयार मावा याची साठवणूक करुन मावा तयार करण्याची मशीनवर मिळून आली.
यावेळी शुभम दत्तात्रय हजारे (रा. केडगाव), मंजितकुमार विजयकुमार सिंग (वय ३८, रा.आरा जि. भोजपुर), आकाश बाळासाहेब शिरसाट (वय २५, रा. नवनागापूर), प्रशांत अशोक नवचर (वय २५, रा. पिंपरी शहाली), महेश देविदास खराडे (वय २२, रा. जेऊर हैबती ता. नेवासा) असे पाच जण ताब्यात घेण्यात आले.
सदर पत्र्याचे शेडची तसेच गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता १,४०,००० रुपये किंमतीचा १४० किलो तयार मावा, ८६,४०० रुपये किमतीची ७२ किलो सुगंधीत तंबाखू, ३५,००० रुपये किंमतीची ७० किलो कच्ची मावा सुपारी, ८०,००० रुपये किंमतीची मावा तयार करण्याची १ मशीन व ३५,००० रुपये किमतीची सुपारी कटींग करण्याची १ मशीन तसेच ५,००,००० रुपये किमतीची तयार मावा ठेवण्यात आलेली फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार असा एकूण ८,७६,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष पंचनामा करुन मुद्देमाल जप्त केला व एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गै, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे.