राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील आरक्षण सोडत २४ जुलै रोजी होणार आहे. तहसील कार्यालय, राहाता येथे दुपारी १२ वाजता ही विशेष सभा होईल, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी चक्रानुक्रमाने (रोटेशन पद्धतीने) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेतला जाईल.
सर्वसाधारण सोडतीनंतर दुपारी १ वाजता महिला उमेदवारांसाठी (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही प्रक्रिया उपविभागीय अधिकारी शिर्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.