कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार बु येथील बेलापूर रोड स्थित लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलातील श्री विघ्नेश्वर मंदिराचा चौथा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळीच श्री विघ्नेश्वर मूर्तीचा अभिषेक व सत्यनारायण महापूजा करून या वर्धापन दिनास सुरुवात करण्यात आली. श्री विघ्नेश्वराच्या अभिषेक करण्याचा व सत्यनारायण महापुजेचा मान प्रमोद कुंभकर्ण व सौ. कुंभकर्ण ताई यांना देण्यात आला. सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच सायंकाळी टाळ, मृदुंग व भजनाच्या स्वरात श्री विघ्नेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीमध्ये विठ्ठल, रुक्मिणी, शंकर, पार्वती संत तुकाराम, राधा, कृष्ण, वारकरी अशी विविध वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी रंगत वाढवली. भजनी मंडळाने तालासुरामध्ये भजन गायन करून संपूर्ण संकुलामधून ही पालखी मिरवणूकीचे आकर्षण वाढविले.
या मिरवणुकीमध्ये संकुलातील तसेच बाहेरील अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते. पालखी मिरवणूकी नंतर श्री विघ्नेश्वर मंदिरामध्ये सामुदायिक महाआरती करण्यात आली. व त्यानंतर सुमारे पाचशे ते साडेपाचशे लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी त्याचा लाभ घेतला. अन्नदानासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
हा वर्धापन दिन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रकाश जाधव, चंद्रकांत शिंदे, संतोष कदम, धोंडिभाऊ सुंबे, संतोष डगळे, सनी जगताप, संपत कडू, रामराब आयनर, भानाराम चौधरी, नाथाभाऊ शिंदे, गणेश शिंदे, निखिल चोथे, प्रवीण धांडगे, गोविंद पाठक, नानासाहेब राजभोज, विठ्ठल म्हसे, नवनाथ रोडे, दत्तात्रय जगताप, सुरेश पऱ्हे, अभिजित पाठक, संजय गिरी, प्रदीप भालके, रवी भालके तसेच इतर अनेक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.