शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच राज्यातही महायुतीची सत्ता येवू शकली. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही यश आपलेच आहे. शत, प्रतिशत भाजपासाठी सर्वांनी कटीबध्द व्हा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी शहर मंडलाच्या नूतन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिर्डी शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्ष पदाधिका-यांनी स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, राज्य कार्यकारी परिषदेचे सदस्य राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपाचे शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर, ताराचंद कोते, योगेश गोंदकर, किरण बो-हाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला मोठी परंपरा लाभली आहे. जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून आज ओळखला जात आहे. विश्वनेते नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व पक्षाला लाभले आहे. आणि यापक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. संघटना बळकट झाली तरच पक्षाला जनाधार अधिक वाढेल. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष हा फक्त भाजपा आहे असे त्यांनी सांगितले.
पहलगाम घटनेचा उल्लेख करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशाची प्रगती इतर देशांना पाहावत नाही. ३७० कलम रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणा-या देशातील विरोधकांना तेथिल पर्यटन वाढीने चोख उत्तर दिले. परंतू अतिरेकी धार्जिण्या पाकीस्तानलाही ते सहन झाले नाही. मात्र पहलगामच्या घटनेने जगाला भारत आता कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज आहे हे दाखवून दिले आहे. आयोध्येमध्ये श्री.राम मंदिराची उभारणी आणि अंत्योदय चळवळीतून लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी यामुळेच सलग तीन वेळा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येवू शकली.
राज्यातही लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख निर्णय होत आहेत. राज्य आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे नमुद करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासालाही त्यांची भक्कम साथ मिळत आहे. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकल्या. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही शत, प्रतिशत भाजप आपल्याला करायचे आहे. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच विधानसभा आपण जिंकली आता येणा-या निवडणूकीत मिळणारे यश हे आपल्याला अधिक ऐतिहासिक करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी आणि परिसराचा विकास करताना युवकांसाठी रोजगार यासाठी आपला प्रयत्न असून, औद्योगिक वसाहत, पशुवैद्यकीय महाविद्यालय, विनातळाचे विस्तारीकरण आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनांची अंमलबजावणी, शिर्डी शहरातील थिमपार्क हा आपल्या विकासाचा अजेंडा असून, यासर्व प्रक्रीयेला राज्यातील महायुती सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे. सुंदर शिर्डी करताना ती सुरक्षित राहण्यासाठी या परिसरातील अवैध धंद्यांना रोखण्यासाठी गावपातळीवर काम करणा-या आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी रविंद्र गोंदकर, अभय शेळके, कैलास कोते, नितीन दिनकर, राजेंद्र गोंदकर यांचीही भाषणं झाली.