पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :-पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील शिवारात सुरू असलेल्या तिरट नावाच्या हार-जीतीच्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने गुरुवारी (दि. २४ ) सायंकाळी धाड टाकून तब्बल ११ जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत एकूण ११ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनिल पवार,अजय साठे ,दिनेश मोरे, मलिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे व पाथर्डी पोलीस ठाण्यातील सुहास गायकवाड, चळक या पथकाने माणिकदौंडी येथील घाटमाथ्यावरील शेतशेडवर छापा टाकून ही कारवाई केली.
या छाप्यात अड्डा चालक आसिर छोटू पठाण (वय ४०, रा. माणिकदौंडी),कलिम नुर महंमद शेख (५१, कोरडगाव),गणेश विष्णु पवळे (४२, पाथर्डी),सोमनाथ रावसाहेब चितळे (३८, चितळवाडी),फिरोज इम्रान पठाण (४२, पाथर्डी),अशोक भगवान दहिफळे (४३, माहिंदा),जुबेर अफसर अली सय्यद(३०, माणिकदौंडी) शाकिर उस्मान पठाण (४८, मानोर, शिरूर, बीड),सलमान कलिम शेख (२६, कोरडगाव),अंबादास बन्सी चितळे (४०, चितळवाडी ) यांच्याकडून रोख रक्कम ९७ हजार,मोबाईल (विविध कंपन्यांचे) ९० हजार,तिरट जुगारासाठी वापरलेले पत्ते (तीन प्रकारचे),बोलेरो कार (एम एच १६ सी वाय ०६९८ ) ७ लाख रुपये,पल्सर (एम एच २० इ डब्यू ३८२६ ) ७० हजार रुपये,होंडा शाईन, युनिकॉर्न, स्प्लेंडर जप्त; अंदाजे एकूण किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा एकूण ११ लाख ६१ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुख्य आरोपी आसिर पठाण याने लोकांकडून पैसे घेऊन हार-जीतीच्या तिरट जुगाराचे आयोजन करतो, अशी कबुली दिली आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार (कलम १२(अ)) गुन्हा दाखल केला आहे.छाप्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अंबादास चितळे यांची पत्नी माजी सरपंच आहेत, तर सोमनाथ चितळे हे माजी सैनिक असून त्यांच्या सहभागामुळे स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.