कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-श्री साई भगवती ग्रुप व ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी (वर्ष 17 वे) श्री भगवती माता मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवार दि. 25 जुलै रोजी श्री साई सच्चरित पारायणास असंख्य भाविक भक्तांच्या साक्षीने भव्य ग्रंथ दिंडी काढुन सुरुवात करण्यात आली.
दरम्यान सकाळी ठीक 7 वा. श्री भगवती मातेची नित्य आरती झाल्यानंतर ठीक 7. 30 वा.भगवती माता मंदिरापासून सनई ताशांच्या गजरात सवाद्य ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता.नेहमीप्रमाणे येथील श्री कोल्ह्याळेश्वर महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर दिंडीचे पुन्हा श्री भगवती माता मंदिरात आगमन झाले. यावेळी डंक परिवारातर्फे कैलास डंक यांना सपत्नीक आरती करण्याचा मान मिळाला. यानंतर पारायणाचे व्यासपीठ चालक ह भ प गणेश महाराज मुसमाडे यांच्या मधुर वाणीने ग्रंथ वाचनास प्रारंभ झाला.
यंदाच्या वर्षी स्त्री व पुरुष मिळून 225 एवढी लक्षणीय पारायन वाचक संख्या असल्याचे श्री साई भगवती ग्रुपच्यावतीने स्वप्निल निबे यांनी सांगितले.ग्रंथ वाचन झाल्यानंतर कोल्हार येथील डॉ.श्याम शिंदे यांनी सपत्नीक आरती केली.वाचन झाल्यानंतर डंक परिवारातर्फे महाप्रसाद तसेच चहाचे वाटप करण्यात आले. दरम्यान आरती झाल्यानंतर कैलास डंक व डॉ.श्याम शिंदे यांचा श्री साई भगवती ग्रुपतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पारायण सांगत्याच्या दिवशी शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 7 वा. अवतरणिका वाचन झाल्यानंतर भव्य ग्रंथ पालखी मिरवणूक काढण्यात येईल.
त्यानंतर सकाळी ठीक 10 ते 12 या वेळेत श्री साई कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होईल.पारायण यशस्वी होण्यासाठी साई भगवती ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.