अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):-भंडारदरा निळवंडे परीसरात पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा विकसित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पर्यटन विकास आराखड्याची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने विभागाच्या सर्व जागा अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारने हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र या उपक्रमाच्या माध्यमातून १० कोटी वृक्ष लागवडीची चळवळ सुरू करण्यात आली असून जलसंपदा विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यातील उपक्रमाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री ना विखे यांचे उपस्थितीत भंडारदरा येथै करण्यात याप्रसंगी आ.डॉ किरण लहामटे आ.अमोल खताळ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे जलसंपदा विभागाचे अधीक्षक प्रांताधिकारी अरुण उंडे तहसिलदार सिध्दार्थ मोरे अभियंता बाळासाहेब शेटे नासिकचे राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे निळवंडे प्रकल्पाचे अभियंता प्रदिप हापसे गणेश हारदे आदी उपस्थित होते.
भंडारदरा धरणाचे शतकमहोत्सवी वर्ष विचारात घेवून या परीसराच्या विकासाचे निर्णय जलसंपदा विभागाने केले आहेत.मंत्री विखे पाटील यांनी आज जलसंपदा विभागाच्या परीसरात असलेल्या जागांची पाहाणी केली.जलसंपदा विभाग प्रथमच हा परीसर पर्यटनाच्या अनुशंगाने विकासित करणार आहे. यासाठी चांगला आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकार्याना दिल्या.
गेली अनेक वर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे जलसंपदा विभागाच्या जागावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले.विभागाच्या जागा असतानाही त्याचा विनियोग करता आला नाही.परंतू आता विभागाने मराठवाडा आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात शक्य असेल त्या ठिकाणी धरण परीसरात असलेल्या सर्व जागा विकसित करण्याचे धोरण घेतले आहे.रंधाफाॅल परीसरातही पर्यटन विकासाचे नियोजन आहे.या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मंत्री विखे पाटील निळवंडे धरण स्थळाची पाहाणी करून या परीसरात तयार करण्यात पर्यटन विकास आराखड्याची पाहाणी करून आवश्यक सूचना केल्या.या भागातही विभागाच्या जागा विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.परीसरातील गावांच्या रस्त्याच्या समस्या जाणून घेत या रस्त्यांचे काम काॅक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.धरणग्रस्तांच्या जमीनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी अरूण उंडे यांना सूचना केल्या.निळवंडे परीसरात वृक्षारोपण करून मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय कालव्यांसाठी पाणी सोडण्यात आले.