पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):-पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
छापेमारी दरम्यान घटनास्थळी तीन महिला आणि पाच पुरुष उपस्थित होते. प्रांजल केवळकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह सात जण मिळाले. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या पतीचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती, आमदार एकनाथ खडसे यांचे जावई या रेव्ह पार्टीत सहभागी असल्याचा संशय आहे.
पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा या ठिकाणी छापा टाकला. खराडी भागातील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असल्याची माहिती आधीपासूनच पोलिसांकडे होती.
कारवाई दरम्यान कुठलाही विरोध न करता सर्व उपस्थितांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. संबंधित नेत्या रोहिणी खडसे यांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.