संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांतता,समृद्धी आणि सुसंस्कृत तालुक्याचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात मागील आठ महिन्यांपासून वातावरण गढूळ झाले असून विकृत प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची काही समाजकंटकांनी छेडछाड केल्याने संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचा अशी मागणी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे.
वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ महादेव मंदिर येथे श्रावण मास निमित्त महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता.मात्र श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील काही विकृत प्रवृत्तींनी या फ्लेक्स ची छेडछाड केली आहे. ही बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली असून अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. ही बातमी कळताच घटनास्थळी आणि कार्यकर्ते जमा झाले. तर संगमनेर तालुक्यातील गावागावांमधून अनेक कार्यकर्त्यांनी यशोधन कार्यालयामध्ये धाव घेतली. यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत केले.
याबाबत तातडीने माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. यावेळी ते म्हणाले की, संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत परंपरा आहे मात्र काही लोकांनी तालुक्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जाती जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. विकास कामांऐवजी आता जातीभेदाचे राजकारण सुरू झाले आहे. कधीही नव्हती अशांत वातावरण निर्माण झाले आहे. फ्लेक्स छेडछाड करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी निलेश थोरात,महेश थोरात,सागर गायकवाड, पोपट थोरात, अनिस तांबोळी, सुनील थोरात,अरुण कुळधरण, नितीन गायकवाड,रोहित गायकवाड, अभिजीत थोरात,गणेश गडगे, गणेश थोरात आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निलेश थोरात म्हणाले की, जर अशा समाजकंटकांना तातडीने अटक झाली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने दोन दिवसांमध्ये भव्य रस्ता रोको करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.
सोशल माध्यमांवर विकृत घटनेचा जाहीर निषेध
वडगाव पान येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या शुभेच्छा फलकाची छेडछाड झाल्याची बातमी तालुक्यात कळतात सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर तालुक्याचे नाव बदनाम करणाऱ्या अशा विकृत लोकांना प्रशासनाने वेळीच थांबवावे आणि कठोर कारवाई करावी. अन्यथा शांत संयमी असलेला संगमनेर तालुका जर पेटला तर याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मागणी करताना तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.