अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवण्यासाठी आणणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १६० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यासह दोघांकडून तीन मोबाइल फोन, चारचाकी वाहन, २१७० रुपयांच्या खऱ्या नोटा असा एकूण १७ लाख ३७ हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) व निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कोंभळी, कर्जत) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गांगर्डे याला न्यायालयाने आज, सोमवारी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. दुसरा आरोपी सोमनाथ शिंदे हा आजारी असल्याने त्याच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. गीते यांना सोलापूर महामार्गाने दोघेजण बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल, रविवारी रात्री दहाच्या सुमारास रुईछत्तिसी (ता. नगर) शिवारात सापळा रचण्यात आला व दोघांना संशयित वाहनासह (एमएच १६ डीएल २७९७) पकडण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंधवा (मध्य प्रदेश) इथून या बनावट नोटा आणल्या गेल्या. एका मोबाइल ॲपद्वारे सेंधवा येथील व्यक्तीने या दोघांना बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी बोलावून घेतले. ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा देण्यात आल्या. पकडलेले दोघेही जागाखरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातूनच त्यांना बनावट नोटांच्या मोबाइल ॲप रॅकेटमार्फत संपर्क साधून आमिष दाखवले गेले. यापूर्वीही राहुरी पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडले होते.