शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी येथे सुरू असलेल्या साई सच्चरित पारायण सोहळ्याला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. १००० रूमजवळ भक्तिमय वातावरणात पारायणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यात त्यांनी साई महाराजांचे प्रवचन करणाऱ्या पूज्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
या पारायण सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून, “ही सामूहिक सेवा आणि श्रद्धेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे,” असे मत डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त.
डॉ. विखे पाटील यांनी भाविक भक्तांसमवेत भारतीय बैठक लावून प्रसाद ग्रहण करताना, या क्षणाला सेवा आणि श्रद्धेचा संगम असे सांगितले. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने पारायण सोहळ्यासाठी एक लाख रुपयांची देणगी आयोजक समितीकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी डॉ. विखे पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यात शिर्डीत होणाऱ्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगामी कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर होईल, अशी माहिती देखील दिली. तसेच त्यांनी आग्रहाने आवाहन केले की, या पावन कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या स्वयंसेवकांनी आमच्याशी संपर्क साधावा.
या पवित्र पारायण सोहळ्यात हजारो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविल्याने परिसर अतिशय भक्तिमय, ऊर्जा आणि एकात्मतेने भारलेला दिसत होता. श्री साई बाबांच्या चरणी मन मोकळं करणाऱ्या या सोहळ्याने प्रत्येकाच्या हृदयात अनमोल स्मृती आणि नवचैतन्य पसरवले. यावेळी अभय शेळके पाटील, भाजपा अध्यक्ष रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते तसेच शिर्डी ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.