संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-भोजापूर धरण लाभक्षेत्रातील पुर चारीला सोडण्यात आलेले पाणी शेवटच्या गावाला मिळेपर्यंत आधिका-यांनी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या आधिका-यांना दिले आहेत. वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांना महायुती सरकारमुळे न्याय देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी पुरचारीला मिळावे अशी मागणी या लाभक्षेत्रातील शेतक-यांचे वर्षानुवर्षे होती. या पुरचारीच्या कामासाठी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून २ कोटी १२ लाख रुपयांचा निधीही मंजुर करुन देण्यात आला होता. विधानसभा निवडणूकीपुर्वी चारीच्या कामाचे भूमीपुजनही मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाणी मिळवून देणारच असा शब्द त्यांनी दिला होता.
यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने ओव्हरफ्लोचे पाणी या पुरचारीतून सोडण्यात आल्याने मागील चाळीस वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या जिरायती पट्ट्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तळेगाव, निमोण या भागातील पळसखेडे, पिंपळे, सोनेवाडी, क-हे, सोनोशी, नान्नज दुमाला या दुष्काळी पट्ट्यातील गावांना वर्षानुवर्षे या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. यासाठी या भागतील शेतकरी सातत्याने पाठपुरावा करुन, पाण्यासाठी संघर्ष करीत होते. याची गंभिर दखल घेत, या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी राज्यात महायुती सरकार आल्यानंतर चांगले प्रयत्न झाले. आ.अमोल खताळ यांनीही चारीच्या कामासाठी पाठपुरावा केला. यंदा चारीतून पाणी वाहील्याने या भागातील शेतकरी आनंदून गेला आहे.
या लाभक्षेत्रातील शेतक-यांना त्यांची भेट घेवून पाणी मिळवून दिल्याबद्दल भोजापूर पुरचारीचे अभ्यासक किसन चत्तर, भाजपाचे मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विठ्ठलराव घोरपडे आदिंनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करुन आभार मानले.तुमच्या मागणी प्रमाणे पाणी देण्याचा शब्द मी पुर्ण केला आहे. आता शेवटच्या गावाला पाणी मिळावे तसेच चारीची गळती थांबविण्यासाठी आधिका-यांरी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.