28.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img
spot_img

सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा घेतला आढावा

मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):-  शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देत पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामे दर्जेदार करून तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही दिल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील काळू नदी प्रकल्प हा महानगरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे.  प्रकल्प पूर्ण झाल्यास महानगरांसाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये जाणाऱ्या वनांसाठी पर्यायी जमिनींचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावे. झाडांच्या नुकसानीचा सर्वे करून त्याबदल्यात संबंधित जिल्ह्यात वनीकरण करावे.

पुनर्वसन गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावांमधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद नाल्या असाव्यात. पुनर्वसित गावामध्ये भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, अशाप्रकारे पाण्याचा उद्भव शोधून योजना पूर्णत्वास न्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, कोकण व  तापी खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरिश महाजन, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत मुख्यमंत्री म्हणाले,  भूसंपादन सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने हे काम पूर्ण करावे.  भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन तातडीने जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावी. प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असून शेतीला शाश्वत सिंचन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे. जिगाव प्रकल्पाचे पुढील टप्प्यासाठी भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरण केले. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, सहसचिव संजीव ताटू तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे संबंधित जिल्हाधिकारी उपस्थित होते.

राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांचा थोडक्यात आढावा

राज्यात सध्या जलसंपदा विभाग अतर्गत 57 प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी एकूण एक लाख सहा हजार पाचशे तेरा हेक्टर जमिन लागणार आहे. त्यापैकी २७ हजार ७५५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे बाकी आहे. तसेच एकूण २१० गावठाणांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यापैकी ११६ गावठाणांचे  पुनर्वसन झाले असून ९४ गावठाणांचे पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात ६ लाख ६८ हजार २६७ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे, तर ७८.९० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!