लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्यावे. मोबाईल पासून विद्यार्थ्यांना दूर करता यावे आणि ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरेच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रवरा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून राज्य आणि देश पातळीवरती खेळणारे विद्यार्थी तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रवरेच्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून मोठी करिअर संधी उपलब्ध होऊन ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा प्रवरेचा संकल्प आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या असलेल्या सिंधुताई विखे पाटील क्रीडांगण या ठिकाणी प्रवरा स्पोर्टस अकॅडमी शुभारंभ प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, अहिल्यानगरचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे, संस्थेच्या संचालिका सौ. अलका दिघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्रवरा कृषिशास्ञ संस्थेचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम,शिक्षण संचालिका सौ,लीलावती सरोदे,डाॅ.महेश खर्डे यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोठाळे, भाऊसाहेब वीर आदींसह संस्थेचे क्रीडा अधिकारी प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संवाद साधतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, चाळीस हजाराहून जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असे क्रीडांगणे आहेत या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राज्य देश आणि आंतर पातळीवरील स्पर्धेत यश मिळवले आहे. संस्थेचे अनेक विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून करिअर करत आज शासकीय आणि निमशासकीय अधिकारी झाले आहेत. संस्थेच्या सर्वच विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये करिअर करता यावे यासाठी प्रवरा स्पोर्टस अॅकेडमी ची सुरुवात करण्यात आली आहे या माध्यमातून दर्जेदार खेळाडू यातून निर्माण व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी मंञी म्हस्के पाटील म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच खेळास महत्व दिले आहे. खेळाच्या माध्यमातून आरोग्य एकाग्रता सांघिक भावना वाढीस लागते या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढे जावे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्रिडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी सांगितले की पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यामध्ये खेळाडूंना विविध सेवा सुविधा देण्यावरती विशेष भर दिला आहे. जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती करत असतानाच जिल्ह्यामध्ये छत्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानही मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून झाला खेळाडूंची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी हाच या मागचा मुख्य हेतू होता. जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार व्हावेत यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही कायमच प्रयत्नशील राहिलेली आहे. प्रवराचे अनेक विद्यार्थी आज राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचले आहेत क्रीडा स्पर्धेसाठी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य होत असल्यामुळे जिल्ह्याचा क्रीडा विभाग हा राज्यामध्ये अग्रेसर ठरला आहे. प्रवरेत सुरू झालेल्या प्रवारा स्पोर्टस अॅकेडमी ला सर्व प्रकारचे सहकार्य येणाऱ्या काळात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे आणि महिलांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आदर्श माता सिंधुताई विखे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू झालेल्या अॅकेडमीच्या माध्यमातून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांबरोबरच लोणी आणि प्रवरा परिसरातील क्रीडा प्रेमींना आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांचे प्रशिक्षण तज्ञ क्रिडा शिक्षकांच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रवरेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी तर आभार विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए . पवार यांनी मानले यावेळी खो-खो हॉलीबॉल ॲथलेटिक्स या स्पर्धा ही संपन्न झाल्या.
प्रवरा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून तायक्कोंदो, व्हाॅलीबाॅल, ॲथलेटिक्स, खो-खो बास्केटबॉल या खेळाबरोबरच भविष्यामध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रवरेच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनाही या अकॅडमी चा उपयोग करता येणार आहे.