लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतक-यांच्या खात्यात १०९ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतक-यांना मोठा आधार मिळत असून, योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. शेतक-यांसाठी सुरु केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून, वर्षाला ६ हजार रुपये थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतक-यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१९ शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये जमा झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सद्य परिस्थितीत पेरणीची कामे सुरु असताना अल्पभूधारक शेतक-यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापुर्वी १९ हप्ते शेतक-यांच्या खात्यात जमा झाल्याने या योजनेबाबत शेतक-यांमध्ये मोठे समाधान आहे.
केंद्र सरकारने शेतक-यांसाठी सुरु केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्वपूर्ण ठरली असून, केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुरु केलेल्या सर्व योजना अखंडीतपणे सुरु आहेत. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकारकडून सातत्य राखले आहे.
अकोले तालुक्यातील ३४ हजार ९४८ शेतक-यांना ६ कोटी ९९ लाख, जामखेड २९ हजार ५८ शेतक-यांना ५ कोटी ८१ लाख, कर्जत ४३ हजार ६१० शेतक-यांना ८ कोटी ७२ लाख , कोपरगाव २९ हजार ६४० शेतक-यांना ५ कोटी ९३ लाख, अहिल्यानगर ३१ हजार २० शेतक-यांना ६ कोटी २० लाख, नेवासा ५४ हजार २८९ शेतक-यांना १० कोटी ८६ लाख, पारनेर ५० हजार ३८३ शेतक-यांना १० कोटी ८ लाख, पाथर्डी ३९ हजार ९५५ शेतक-यांना ७ कोटी ९९ लाख, राहाता २४ हजार १०८ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख, राहुरी ३८ हजार ५६३ शेतक-यांना ७ कोटी ७१ लाख, संगमनेर ५९ हजार १२८ शेतक-यांना ११ कोटी ८३ लाख, शेवगाव ४१ हजार ९०१ शेतक-यांना ८ कोटी ३८ लाख, श्रीगोंदा ५० हजार ५७१ शेतक-यांना १० कोटी ११ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३४३ शेतक-यांना ४ कोटी ४७ लाख रुपये. अशा रक्कमा तालुकानिहाय शेतकयांच्या खात्यात वर्ग झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.