श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने बेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.
माहिती अशी की,दि. 01 रोजी दिपक बाळासाहेब चव्हाण, (माजी नगरसेवक) वय 44 वर्षे, रा. बाजारतळ, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर हे रात्री 10/30 वा. सुमारास भगतसिंग चौक श्रीरामपूर येथुन त्यांच्या घरी बाजारतळ वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे जाण्यासाठी गिरमे चौकमार्गे किशोर टॉकीज समोरुन जात असताना अचानक त्यांचा पाठलाग करत तीन ते चार मोटारसायकल आल्या.त्यावरील 5 ते 6 अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवुन जातीवाचक शिवीगाळ करुन मोटारसायकलवरुन खाली ओढुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यांच्या गळयातील दोन तोळ्यांची सोन्याची चॅन काढून घेत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पळून गेले.
या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुरनं. 727/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 126(2),119(1),189(2),191(2),190,115(2),352,351(2) प्रमाणे दि. 02/08/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांच्या तपास पथकास सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पण करुन त्यांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने घटनास्थळी जावुन तांत्रिक विश्लेषन करुन गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पण केले असता त्यांची नावे अरबाज जाकीर शेख, (वय 24 वर्षे, रा. राममंदिर जवळ, वॉर्ड नं. 05 श्रीरामपूर ) हुजेब अनिस शेख, (वय 21 वर्षे, रा. मोरगेवस्ती टॉवर जवळ, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर), समीर मोहम्मद शेख, (वय 22 वर्षे, रा.लोणारगल्ली वॉर्ड नं. 05, श्रीरामपूर ), आकाश राजेंद्र चौगुले,( वय 23 वर्षे, रा. मोरगेवस्ती वॉर्ड नं.07, श्रीरामपूर), लक्ष्मण जनार्दन साबळे (रा. विजय हॉटेलच्या मागे, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर) असे असल्याचे पोलिसांना समजले.आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील आरोपी क्रं. 01 ते 04 हे बेलापूर परिसरात येणार आहे.
त्यावरून तपास पथकाने बेलापूर परिसरात सापळा लावुन सदरचे आरोपी आल्याची खात्री होताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात चोवीस तासाच्या आत तात्काळ अटक करण्यात आली आहे.