शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावावर तब्बल ६२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार गणेश बप्पासाहेब डोंगरे (वय ४०, रा. काटे वस्ती, आखेगाव) याला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई १ ऑगस्ट रोजी पहाटे करण्यात आली असून, न्यायालयात त्याला हजर करण्यात आले आहे.
फिर्यादी गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे (वय ५८, रा. ठाकुल निमगाव, ता. शेवगाव) यांच्या तक्रारीनुसार, ‘श्री विठ्ठल संपर्क कार्यालय’ या नावाने आखेगाव रोड, शेवगाव येथे शेअर मार्केट ट्रेडिंगचे कार्यालय सुरू करून आरोपी डोंगरे यांनी फिर्यादीसह अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली. मात्र, ठरल्याप्रमाणे नफ्याची परतफेड न करता त्यांनी आर्थिक फसवणूक केली.
या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६७/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासघात), ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग) तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी डोंगरे आपल्या घरामागील खोलीत झोपलेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन पोलिस पथकांनी शोधमोहीम राबवून आरोपीस ताब्यात घेतले.
या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोसई बाजीराव सानप, पोहेकॉ. किशोर काळे, पोकॉ. शाम गुंजाळ, भगवान सानप, ईश्वर बेरड, राजू बढे, सचिन पिरगळ, एकनाथ गर्कळ, प्रशांत आंधळे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकॉ. राहुल गुड्डु यांनी ही कामगिरी पार पाडली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करत आहेत. दरम्यान, या फसवणुकीचा आणखी कोणी बळी ठरला असल्यास त्यांनी तत्काळ शेवगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.