अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा): –सध्याचे लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढत आहे. आपल्या संस्कृतीला जपणे हे प्रत्येक समाज घटकाचे काम आहे. त्या पद्धतीने लग्न सोहळा करणे व आपली व समाजाचे निष्ठा बाळगणे हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थांचे संचालक व राष्ट्रीय संत ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी केले
मराठा लग्न आचारसंहिता संमेलन कोहिनूर मंगल कार्यालय येथे पार पडले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र डोंगरगण येथील संत ह भ प जंगले महाराज शास्त्री हे होते. या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम भैया जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी मान्यवर प्रमुखातिथी म्हणून उपस्थित होते.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या नंतर व समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचार यासंदर्भात अहिल्यानगर शहरातील मराठा समाजातील मान्यवर लोकांनी राज्यात सर्व प्रथम एकत्र येऊन मराठा आचारसंहिता ही तयार केली होती. या संदर्भात पहिले संमेलन कोहिनूर मंगल कार्यालय आज सकाळी घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रत्येक घटकातील ११ सदस्यांना वीस कलमी आचारसंहितेची शपथ देण्यात. यामध्ये उद्योजक, समाजसेवक,वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार तसेच मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड,मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी,छावा संघटना आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधी यांना शपथ देण्यात आली ,ते पुढे म्हणाले की आपण स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा एका दिवसात बदल घडणार नाही पण एक दिवस असा येईल की त्या दिवशी संपूर्ण विवाह पद्धती ही बदलती जाणार आहे. आजच्या अनेक विवाहामध्ये जुन्या रूढी परंपरा नष्ट होत आहेत. जात, धर्म, पंथ यापेक्षा आपण मोठे लग्न कसे करू असे अनेक समाजातआहेत. ही प्रवृत्ती मोडीत काढली पाहिजे. मराठा समाजातील या मान्यवरांनी जी आचारसंहिता आपल्यासमोर ठेवली आहे तिचे पालन आपण जर केले तर इतर समाजही त्याचा आदर्श घेतील. त्यामुळे उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे
यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, प्रत्येक गावामध्ये या आचारसंहितेचे सामूहिक वाचन होणे गरजेचे आहे. या संहितेचे पालन फक्त मराठा समाजाने नाही तर इतर समाजाने सुद्धा केले पाहिजे. आपलं गाव, आपला देश, आपला प्रदेश, आपले कुटुंब,आपली संस्कृती जपण्याचे काम हे यापुढील काळात सगळ्यांनी केले पाहिजे.
यावेळी बोलताना आमदार संग्रामभैया जगताप म्हणाले की मराठा म्हणजे महाराष्ट्र. मराठा समाजाने मोठा भाऊ या नात्याने पुढे येऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करून इतर समाजाला बरोबर घेऊन त्यांना सुद्धा आचारसंहिता पाळण्यासाठी प्रयत्न केले तर अनेक कुटुंबांचे यामुळे भले होऊ शकेल.
यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की माझ्या घरातील प्रत्येक लग्न अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आजची ही चळवळ बीड सह संपूर्ण मराठवाड्यात राबवण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज मराठा समाजाने एकत्र येऊन हे उचललेले पाऊल म्हणजे एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे.
यावेळी बोलताना ह भ प जंगले महाराज शास्त्री म्हणाले की संस्कृती ही महिलेच्या खांद्यावर असते. महिलेने जर संस्कृतीत आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना वाढवले तर समाजापुढे नवा आदर्श निर्माण होईल. समाजाने या गोष्टी स्वीकारणे ही काळाची गरज आहे . एकाच दिवशी हा बदल होणार नाही पण बदलाचे वारे म्हणजे हे संमेलन आहे. समूहाने ठरवले तर काहीही करता येईल. संस्कृतीने समाजाला बांधून ठेवता येईल. आज संतवाणी याच विचाराने महाराष्ट्रात चालू आहे. समाज सुधारण्याचे काम आम्ही मंडळी करत असताना समाजाला याबाबत जागृत करणे व ही आचारसंहिता पालन करण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार करणे ही आमची ही तेवढीच जबाबदारीआहे . पुढील काळात वारकरी संप्रदायातील लोक या चळवळीला अधिक व्यापक करतील असे ते म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना सुकाणू समितीचे प्रमुख समन्वयक उद्योजक एन. बी.धुमाळ म्हणाले की ज्यावेळी पुण्यातील घटना घडली आणि इतर काही घटना घडल्या त्यातून समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आचारसंहिता तयार केली. त्याची अंमलबजावणी ३१ मे पासून सुरू झाली. अनेक जिल्ह्याने ती स्वीकारली तसेच इतर समाजाने पण ती स्वीकारली आहे. ही चळवळ अधिक व्यापक कशी करता येईल हा आमचा विचार असून यासाठी समाज बांधवांनी पुढे येणे गरजेचेआहे . हे करत असताना समाज आर्थिक साक्षर कसा होईल आणि उद्योग क्षेत्रामध्ये समाजातील तरुण मंडळी कसे पुढे येतील याचा विचार झाला पाहिजे.
यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी या आचारसंहिते मागील भूमिका विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश भगत यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश इथापे यांनी मानले..
याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे, प्राचार्य खासराव शितोळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ॲड .स्वाती जाधव, किशोर मरकड, दशरथ खोसे, अशोक कुटे, प्रा अशोक घोरपडे, ॲड सुभाष काकडे,सी.ए राजेंद्र काळे, ॲड सुभाष काकडे, ॲड भीमराज काकड, अँड. सुभाष भोर,ॲड. शिवाजी कराळे, डॉ. अविनाश मोरे, मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी,जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष नंदिनी सोनाळे, माजी महापौर शीलाताई शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सदस्या संपूर्णा सावंत, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, ज्येष्ठ लेखक संजय कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध साहित्य चळवळीचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्योजक हरिभाऊ डोके, शेतकरी संघटनेच्या बापूसाहेब भोसले नगरसेवक बाळासाहेब पवार महिला समितीच्या सदस्या ॲड .अनुराधा येवले, दिलीपराव मिस्कीन, शशिकांत भामरे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेश मस्के, इंजी .बप्पासाहेब बोडखे, मराठा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण सोनाळे, सतीश इंगळे , उदय अनभूले, मराठा सोयरीक संस्थेच्या जयश्री कुटे, आदींसह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.