25.8 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी प्रस्तावित प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):-  महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी प्रस्तावित प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सिंचन भवन, नाशिक येथे आज उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलिप बनकर, आमदार डॉ. राहूल आहेर, आमदार राहूल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल खाताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक प्रकाश मिसाळ, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहिल्यानगर बाळासाहेब शेटे, उपसचिव प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता गणेश हारदे यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा डीपीआर जानेवारी २०२६ पर्यंत शासनाला सादर होणार असून त्यावर सत्वर कार्यवाही सुरू होईल. दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा देवनदी गोदावरी लिंक, उल्हास वैतरणा गोदावरी, पार गोदावरी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून याचा फायदा नाशिक, संभाजी नगर आणि मराठवाड्याला होणार आहे. याद्वारे मूलबक स्वरूपात पाणी उपलब्ध होणार आहे. राज्यातील हे नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ९० टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील बहुतांश धरणांमध्ये गाळ व गाळयुक्त वाळू मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही धरणे गाळमुक्त करण्यासाठी शासनस्तरावर नियोजन सुरू आहे. धरणातून मिळाणाऱ्या पाण्याच्या कालव्यांची गळती थांबविण्यासाठी लायनिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचेही काम हाती घेण्यात आले असून यामुळे विदर्भातील दहा जिल्ह्यांना याच लाभ होणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी 30 प्रवाही वळण योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर आहेत. याद्वारे 7.40 अ.घ.फूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. तसेच दमणगंगा पिंजाळ या नदीजोड योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यातुन 10 अ.घ.फूट पाणी वैतरणा धरणातून मुकणे धरणात वळविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त भविष्यकालीन योजनांद्वारे 5.50 अ.घ.फूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. तसेच तीन नदीजोड प्रकल्पांद्वारे 12.43 अ.घ.फूट पाणी व पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील 54.70 अ.घ.फूट पाणी असे एकूण 90 अ.घ.फूट पाणी वळविणे प्रस्तावित असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने व नाशिकच्या पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी, नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे संपूर्ण ११५ टीएमसी पाणी पूर्णपणे गोदावरी खोऱ्यात वळवावे. पथदर्शी मांजरपाडा हा प्रकल्पाच्या माध्यामातून येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचले आहे परंतु हे पाणी पुरेसे नसून अधिक पाण्याची आवश्यकता आहे. गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी पोचविण्यात येऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावा असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.

मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात नदीजोड प्रकल्पाची सुरवात होत असतांना शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना शेतीसाठी मुलबल पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या वेळेत घेण्यात येवून या संदर्भातल डिपीआर व अनुषंगिक कामास गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शहरात उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालय सुरू झाल्यामुळे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कामांचा पाठपुरवा करणे सोयीचे होणार असून निश्चित कामांना गती मिळणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. नाशिक जिल्ह्यात धरणांची संख्या जास्त असून या धरणांची पाणीधारण क्षमता अधिक वाढविण्याासाठी धरणांमध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात यावे असे अधिकाऱ्यांना सूचित केले.

कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांच्या हस्ते उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले व कार्यालयाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. मिसाळ यांनी केले तर आभार अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!