शिर्डी,(जनता आवाज वृत्तसेवा): – महसूल महोत्सवानिमित्त राहाता तालुक्यातील लोणी, खडकेवाके, बाभळेश्वर, पुणतांबा, अस्तगाव व पिंपळवाडी येथे आयोजित शिवछत्रपती समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरांमध्ये चारशेहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला.
लोणी येथील मुख्य शिबिरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी जिंवत ७/१२ मोहीम, वारस नोंदी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, अॅग्रीस्टक योजना, उत्पन्न व जात दाखले वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.
शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे व मंडळाधिकारी, तलाठी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत नागरिकांशी संवाद साधला.
महसूल विभागाच्या पुढाकारामुळे गावागावात शासकीय सेवा पोहोचत असून समाधान शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.