22.1 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

बचत गटाच्या चळवळीने महीलांना स्वयपूर्ण आणि आत्मनिर्भर केले-डाॅ सुजय विखे पाटील

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-महिला बचत गटाची चळवळ केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला बचत गटांना पापड मेकिंग मशीन वितरण डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

श्रीरामपूर तालुक्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी भविष्यात आणखी काही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिठाच्या गिरण्या, मसाला यंत्र, वजन काटे, पॅकिंग मशीन, पापड मेकिंग मशीन यासह खेळते भांडवल व शासकीय योजनांअंतर्गत कर्जाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, श्रीरामपूर तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात महिला बचत गटांना व्यवसायासाठी उपयुक्त वस्तूंचे आणि कर्जाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, तसेच महायुतीचे शहर पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व विविध गटांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, मागील दोन वर्षांमध्ये सुमारे १०० हून अधिक गटांना पिठगिरण्या, मसाला यंत्रे, शेवया मशीन आदींचे वाटप करण्यात आले आहे. आता पापड मेकिंगयंत्रे वाटप झाल्यानंतर त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवले जाईल.

श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक आणि आर्थिक विसंगतीवरही त्यांनी भाष्य करत सांगितले की, अनेक गरीब कुटुंबे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, त्यांना शासकीय धान्य मिळत नाही, मात्र गाड्या आणि बंगले असलेले लोक योजनेचा लाभ घेत आहेत. ही अन्यायकारक परिस्थिती बदलणे आवश्यक असून, प्रत्येक गावात शिबिरे घेऊन गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून दिला जाईल.

कार्यक्रमात त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी शरदभाऊ नवले यांची निवड जाहीर केली. यापुढे गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय कार्यक्रमांमध्ये वेळेचे भान ठेवून काम करण्याची नवी कार्यसंस्कृती रुजवावी, असे सांगत त्यांनी कार्यक्रम एका तासात पूर्ण झाला पाहिजे, याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहिलेल्या सर्व माता-भगिनींचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुजय विखे पाटील यांनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहता तालुक्यातील अस्तगाव माथ्यावर आयोजित प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुराण कथेसाठी उपस्थित महिलांना निमंत्रण दिले. महिलांसाठी विशेष नोंदणी करून त्यांना कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!