लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-शासनाच्या योजना आणि शेतकरी हिताच्य निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून विखे परिवार राजकारण नाही तर फक्त समाजकारण करतो असे प्रतिपादन जिल्हा पतिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयाच्या प्रांगणात लोणी महसूल मंडला अंतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.विखे उपस्थित होत्या.अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील होते.सरपंच कल्पना मैड,विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे,अशोक घोलप, हसनापूर सोसायटीचे चेअरमन नासिर पटेल,लक्ष्मण बनसोडे,आबासाहेब घोलप,ग्रामविकास अधिकारी कविता आहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सौ.विखे यांच्या हस्ते प्रारंभी उत्पन्न दाखले,डोमेसाईल दाखले,शेतकरी ओळखपत्र,वारस दाखले आदींचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी सौ.विखे म्हणाल्या,ना.विखे पाटील महसूल मंत्री असताना शिर्डी मतदार संघात २६१ कोटींची विविध कामे केली.कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात विशेष बाब म्हणून मदत केली.निळवंडे धरणाचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचवले.आम्ही नियमबाह्य काम करीत नाही तर अडचणीतून मार्ग काढतो.विविध खात्यातील शासकीय अधिकारी चांगले काम करीत असून राहाता तालुका विकासात आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी केला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी महसूल सप्ताहाची माहिती देतांना नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उत्कृष्ट तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल लोणी खुर्दच्या कामगार तलाठी मंजुश्री संदीप ठाकरे आणि लोणी बुद्रुक येथे कामगार तलाठी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संग्राम देशमुख यांच्या सौ.विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप ठाकरे यांनी केले.महसूल मंडळातील तलाठी,नागरिक,विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.