लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून १९७७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या त्यांच्या भूमिपुत्र ग्रंथाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
जेष्ठ लेखक राजा मंगळवेढेकर यांनी शब्दबध्द केलेला आणि माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावणा असलेला भूमिपुत्र हा ग्रंथ पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकुणच जीवनाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. नव्या पिढीला संपूर्ण सहकार चळवळीची वाटचाल आणि पद्मश्रींच्या व्यक्तिमत्वाची माहीती व्हावी म्हणून हा ग्रंथ पुन्हा नव्या स्वरुपात प्रकाशित करण्याचा निर्णय प्रवरा परिवाराने घेतला.
लेखक राजा मंगळवेढेकर यांनी पद्मश्रींच्या एकुणच जीवनाची वाटचाल शब्दबध्द करताना शंभर वर्षांपुर्वी ग्रामीण भागात असलेल्या आरोग्याच्या असुविधा, पद्मश्रींकडे असलेल्या नाडी परिक्षणाची विद्या. याबरोबरीने अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मटता, बुरसटलेल्या रुढी परंपरा आणि गुलामी मानसीकता या विरोधात पद्मश्रींनी केलेले कार्य आणि इंग्रज सरकारने सहकाराचा कायदा करुन,त्याला प्रतिसाद मिळत नव्हता.यावरुनच केवळ कायदे करुन भागणार नाहीत तर जमीनीवर उभे राहून त्यांनी शेतक-यांना संघटीत करुन, सुरु केलेल्या चळवळीचा इतिहास भूमिपुत्र ग्रंथातून पुढे आणला.
नव्या आवृत्तीच्या माध्यमातून हा संपूर्ण इतिहास नव्या पिढीला समजावा ही भूमिका आहे असे सांगून मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजच्या परिस्थितीत स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, समाज उन्नतीच्या चळवळी आणि समाज सुधारकांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा नव्या पिढीने बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. विसाव्या शतकातील ग्रामीण जीवनावर प्रभाव पाडणा-या विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आणि विचारांचा संदेश हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी १९७७ साली प्रकाशित झालेला हा ग्रंथ नव्या रुपामध्ये साहित्य जगतात आणला आहे.
पद्मश्रींच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणा-या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात या ग्रंथाचे प्रकाशन व्हावे हा सुध्दा आमच्या दृष्टीने आनंददायी क्षण आहे. गेली ३५ वर्ष साहित्य पुरस्कारांची ही परंपरा प्रवरा परिवाराने सुरु ठेवली आहे. सहकार आणि साहित्य यांचे अनोखे नाते सांगणारा हा पुरस्कार सोहळा साहित्य जगातासाठी एक पर्वणी असतो. सहकाराच्या पंढरीत मराठी सारस्वतांचा होणारा सन्मान हा आमच्या दृष्टीने नक्कीच अभिमान असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.