20.1 C
New York
Friday, August 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा): – नेवासा तालुक्यासह शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी‌ ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नेवासा नगरपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार विठ्ठल लंघे पाटील, तहसीलदार संजय बिरादार, मुख्याधिकारी संतोष लांडगे, मनोज पारखे, भाऊसाहेब वाघ, किसन गडाख, प्रभाकर शिंदे, डॉ. करणसिंग घुले आदी उपस्थित होते.

विकासकामांमुळे परिवर्तनाची नांदी झाल्याचे सांगत पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, “नेवासा शहराच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात येत आहेत. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत असून संत ज्ञानेश्वर सृष्टीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तेथेही विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.”

“मधमेश्वर येथील बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी साठवणुकीची क्षमता वाढणार आहे. प्रदूषणमुक्त नद्या ही काळाची गरज असून, नदीकाठच्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे काम जलसंपदा विभागामार्फत हाती घेण्यात येत आहे. नेवासा शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जाणार नाही. त्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरणासाठी केंद्र उभारले जाईल व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.”असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आमदार श्री.लंघे पाटील म्हणाले, “पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीची कामेसुद्धा सुरू झाली आहेत. संत ज्ञानेश्वर सृष्टीसाठीचा आराखडा तयार असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे राबविली जातील.”

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सुशोभीकरण, आर.सी.सी. ड्रेनेज लाईन; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सोलर हायमास्ट, अग्निशमन केंद्र इमारत; नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ४ व ७ मधील रस्ते काँक्रीटीकरण, श्री ओमशांती केंद्र ते मधमेश्वर मंदिर मार्गाचे काँक्रीटीकरण, जुन्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण, अग्निशमन वाहनांचे लोकार्पण, वाड्या-वस्त्यांतील पाइपलाइन व ड्रेनेज लाईन, खडका फाटा रोड ते एफएसटीपी प्रकल्पापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, एलटी लाईन, स्ट्रीट लाईट पोल आदी विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!