श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर तालुक्यातील मौजे माळेवाडी ,सराला ,उंदीरगाव, महांकळ वाडगाव सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे शेती साहित्य गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने चोरी जात असून याबाबत पोलीस प्रशासन निष्क्रिय व अनुभिज्ञ दिसून आले असलेचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिलेल्या निवेदनात व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रामुख्याने शेती पंप केबल ,स्टार्टर, स्पिंकलर सेट या साहित्याचा समावेश आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनामध्ये जाऊन तक्रारी नोंदविल्या आहेत. परंतु पोलीस प्रशासनाकडून अशा शेतकऱ्यांच्या होत असलेल्या गंभीर चोऱ्यांबाबत दखल घेतली गेली नाही. आज रोजी शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असून चोरी गेलेले शेती साहित्य नवीन बाजारातून खरेदीसाठी त्याची ऐपत नाही. या सर्व बाबींचा परिणाम त्याच्या शेती व्यवसायावर होत असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला कुणीही वाली नाही.
चोरी झालेल्या साहित्याच्या सातत्याने तक्रारी करू नये पोलीस प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मी स्वतः अनिल प्रभाकर औताडे या नावाने शेतीपंप चोरी बाबत दोन वेळा नोंदविला असून याबाबतची दखल पोलीस प्रशासनाने घेतली नाही. गट नंबर 129 मौजे साराला मधून माझी तीन वर्षात तिसरी मोटार चोरी केली आहे. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातीलच व्यक्ती कार्यरत असताना त्यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे.
परंतु याबाबत शेतकऱ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत निराशा निर्माण झाली आहे. एफ आर आय नोंदविण्यासाठी एक तर शेतकऱ्यांकडे शेती साहित्य खरेदीची बिले नसतात त्यामुळे 90% एफ आर आय नोंदविले जात नाही. ज्यांच्याकडे बिले असतात अशा शेतकऱ्यांनी एफ आर आय नोंदविल्यास त्याबाबत कुठल्याही चोरी गेलेल्या मुद्देमालाचा पोलिसांकडून शोध लागत नाही ही बाब पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने नामुष्कीची व दुर्दैवी आहे. आज रोजी माझी तिसरी मोटार चोरी गेली आहे.
शेतकऱ्यांनी चोरी गेलेल्या शेती साहित्याचा एफ आर आय नोंदविल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आजपर्यंत कधीही घटनास्थळी जाऊन साधा पंचनामा देखील केलेला नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षित बाबीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती निरडावली आहे. या निरडावलेल्या भुरट्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनोबल वाढल्यामुळे सर्रास शेती साहित्याच्या चोऱ्या होताना दिसत आहे.
तरी याबाबतची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेऊन आज पर्यंत परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या चोरी झालेल्या शेती साहित्याचा तपास लावून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी संरक्षण द्यावे अन्यथा 20 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात येईल. याबाबतची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिलेल्या निवेदनात व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.