अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने नागपूर–पुणे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, हा निर्णय अहिल्यानगरच्या व्यावसायिक, उद्योजक व विद्यार्थ्यांकरीता मोठी उपलब्धी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नागपूर–पुणे वंदे भारत ट्रेन जलद गतीची व सर्वात लांब पल्ल्याच्या मार्गावरील ट्रेन सुरू केल्याबद्दल तसेच अहिल्यानगर व कोपरगाव येथील स्थानकांवर या ट्रेनला थांबे दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार पालकमंत्री विखे पाटील यांनी मानले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूरच्या उपराजधानी व पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीदरम्यान सुरू झालेली वंदे भारत ट्रेन अहिल्यानगरच्या औद्योगिक, व्यावसायिक व विद्यार्थ्यांकरीता प्रवासाचा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. पुणे–अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणारे नागरिक मोठ्या संख्येने असून, जलद प्रवास व वेळ बचतीसाठी या ट्रेनचा मोठा फायदा जिल्ह्यातील प्रवाशांना होईल. कोपरगाव तसेच मनमाड येथेही या ट्रेनचा थांबा असल्याने देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना शिर्डीच्या तीर्थक्षेत्री पोहोचणे अधिक सोयीस्कर ठरेल.
राज्याला मिळालेली ही बारावी वंदे भारत ट्रेन असून, यापूर्वी मुंबई–शिर्डी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यालाही साईभक्त व जिल्ह्यातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.