श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा आरक्षणाचा लढा आता आरपार लढायचा असून मुंबईतून यावेळी मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत यायचे आहे.त्यासाठी २९ ऑगस्टला प्रत्येक घरातून एक गाडी घेऊन घराबाहेर पडावे आणि मुंबईत आपली ताकद दाखवावी असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी अहिल्यानगर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी प्रसंगी केले.
काल अहिल्यानगर येथील सरकारी विश्रामगृह येथे मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेऊन चर्चा केली. श्रीरामपूर येथील अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी मुंबईच्या आंदोलनासंदर्भात बातचीत करून आंदोलनाची रूपरेषा जाणून घेतली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, इतरांना आरक्षण मिळाले.त्यावेळेस आम्ही कोणाला विरोध केला नाही,आम्ही भेदभाव करत नाही.आमची मुलं तशी त्यांची मुलं अशी भूमिका आम्ही ठेवतो. मग आमच्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळत असेल तर त्याला इतरांनी विरोध करण्याचे कारण नाही. ओबीसी मधील जाती १०८ वरून ५०० च्या पुढे गेल्या तरी आम्ही काही म्हटलो नाही.
ओबीसी त पाच-सहा जाती अशा आहेत की,त्यांना ओबीसीचे नाही तर एस.सी.च्या सवलती मिळतात. विशेष म्हणजे या सवलती त्यांचे नेतेच घेतात. त्यांच्या जातीच्या गोरगरिबांना ते मात्र या सवलती देत नाहीत असा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला दीड वर्ष उलटून गेले सरकारला आणखी किती वेळ द्यायचा? मराठा म्हणजेच कुणबी या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवण्याची आता हीच वेळ आहे. माझी तब्येत साथ देत नाही, मी काही दिवसांचा कदाचित तुमचा सोबती असेल,परंतु मला मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळूनच द्यायचे आहे. काही झाले तरी २९ तारखेला आपण मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत येऊ,त्यासाठी सर्वांनी मुंबईकडे कूच करावी. त्यासाठी प्रत्येक घरातून एक गाडी याप्रमाणे गावोगावातून बाहेर पडून मुंबईत लाखोंच्या संख्येने आपल्याला हजेरी लावायची असल्याचे यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने अहिल्यानगर येथील जरांगे यांच्या पदयात्रेदरम्यान एक लाख लोकांना जेवणाचे नियोजन केले होते. श्रीरामपूरातून आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढला होता,एवढेच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण,साखळी उपोषण श्रीरामपुरात करण्यात आले होते.त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दर्शवला होता.तसेच नुकताच गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमही घेतल्याची माहिती देत ॲड.बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूर अखंड मराठा समाजाचे कामकाज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडले.
अखंड मराठा समाज श्रीरामपूरने आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव करत जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आंदोलनात श्रीरामपूरच्या सर्व लोकांनी पुढाकार घेऊन नियोजन करत मुंबई चा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.मुंबईच्या आंदोलनात संदर्भात गावोगावी तसेच शहरात बैठका घेऊन “चलो मुंबई”चे नियोजन करू असे आश्वासन यावेळी श्रीरामपूरच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना दिले.यावेळी अखंड मराठा समाज श्रीरामपूरचे मराठा सेवक सुरेश कांगुणे,कामगार नेते नागेश सावंत,शरद अंबादास नवले,दत्तात्रय जाधव,अमोल बोंबले,सुधाकर तावडे, ऋषिकेश मोरगे,युवराज आगे,रोहित भोसले,युवराज नानासाहेब गलांडे,सतीश नाईक,गोकुळ भालदंड, मनोज बोडखे,नवनाथ गायके,सुनील ताके आदी उपस्थित होते.